चंद्रपूर : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील २० हजारांवर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मंगळवारी सकाळी ११ वाजपापासून जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, नगर परिषद, महापालिका, रुग्णालय आदी ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक जेऊरकर, कार्याध्यक्ष राजू धांडे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती. यावेळी ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’चा नारा देण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. विशेष म्हणजे, परीक्षेवर संपाचा कोणताही परिणाम झाला नसल्याने शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शाळा उघडण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.