कोरोना संकटकाळात मजुरांना मोठा आधार
घनश्याम नवघडे
नागभीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनने आजवर बंद असलेल्या रोजगार हमीच्या कामांनी आता गती पकडली आहे. नागभीड पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमीची विविध ९१ कामे सुरू झाली असून या ९१ कामांवर ६ हजार २०१ मजूर कोरोनाचे नियम पाळून काम करीत असल्याची माहिती आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या बहुतेक कामे बंद आहेत. या पार्श्वभूमीवर ही कामे कामगारांना दिलासा देत आहेत.
नागभीड तालुका उद्योग विरहित आहे. या तालुक्यात मोठेच नाही तर कोणतेच लहानसहान उद्योग नाहीत. नागभीड येथे एमआयडीसी स्थापना करण्यात आली आहे. याला आता ३० वर्षाच्यावर कालावधी झाला आहे. मात्र आजपर्यंत एकही मोठा किंवा छोटा उद्योग या ठिकाणी उभा झाला नाही. या ३० वर्षात भूखंड बुक करून ठेवण्याचेच उद्योग झाले आहेत. म्हणूनच शेतीची कामे आटोपली की या तालुक्यातील मजूर रोजगारासाठी दरवर्षी नागपूर, वर्धा या जिल्ह्यात आणि आंध्र, तेलंगणाच्या सीमावर्ती भागात स्थलांतर करीत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरही बंद झाले आहे. त्यामुळे मजूरवर्ग गावातच रोजगार शोधत आहे.
या तालुक्याची संपूर्ण अर्थव्यवस्था धान पिकावर अवलंबून आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षात निसर्ग दाखवत असलेल्या अवकृपेने या तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत येत आहे.
बॉक्स
अनेक ठिकाणी रोहयोशिवाय पर्याय नाही
शेतकरी,शेतमजूर हंगामानंतर रोजगार हमीच्या कामांवर अवलंबून असतात. धानाची फसल हातात आल्यानंतर मे महिन्यापर्यंत शेतीची कोणतीच कामे राहत नसल्याने आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी रोजगार हमीच्या कामांना पसंती देतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्वच कामे बंद आहेत. यात रोजगार हमीच्या कामांचाही समावेश होता. हाताला कोणतेच काम नसल्याने मजूर वर्ग चांगलाच अडचणीत आला होता.या मजुरांचा गावातील ग्रामपंचायतींवर चांगलाच दबाव वाढला.आणि ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे कामाची मागणी केली. त्यानंतरच ही कामे सुरू झाली.
बॉक्स
ही कामे सुरू
सद्यस्थितीत नागभीड तालुक्यात रोजगार हमीची ९१ कामे सुरू असल्याची माहिती आहे. यात पांदण रस्त्याची ६ कामे सुरू असून १ हजार ९८१ मजूर काम करीत आहेत. वृक्ष लागवडची ५० कामे असून ८१३ मजूर, तलाव खोलीकरणाच्या ६ कामांवर २ हजार १० मजूर, नहर खोलीकरणाच्या कामावर १ हजार २६७ मजूर आणि इतर घरकूल, विहीर कामे सुरू असून या कामांवर मजूर काम करीत आहे.
कोट
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांना कोणतेच काम नव्हते. या मजुरांनी ग्रामपंचायतीकडे कामाची मागणी केली. ही मागणी ग्रा.पं.ने पंचायत समितीकडे लावून धरली. मंजुरी मिळाल्यानंतर गावात तलाव खोलीकरणाचे काम सुरू करण्यात आले. कोरोनाचे नियम पाळून काम सुरू असून ३५० मजूर कामावर आहेत.
- गणेश गड्डमवार, सरपंच मिंडाळा.