तालुका उद्योगविरहित आहे. सहकारी संस्थांनी रोजगाराभिमुख योजनांकडे लक्ष दिल्यास तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळू शकते. असा विश्वास येथील नागरिकांना आहे.
सहकार क्षेत्रात पूर्वी नागभीड तालुक्याचे नाव अग्रक्रमावर होते. अनेक सहकारी दूध संकलन संस्था, भात गिरण्या, ग्रामोद्योग मंडळ, सहकारी संस्था सहकार तत्वावर संचालित केल्याजात होत्या. काळाच्या ओघात यातील काही संस्था आता बंद पडल्या आहे. काही संस्था मात्र अद्यापही सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मागील २०-२५ वर्र्षांमध्ये या सहकारी पतसंस्थांनी तालुक्यात आपली पाळेमुळे रोवली आहेत.
तालुक्यात प्रथमत: स्वामी विवेकानंद या पतसंस्थेच्या माध्यमातून १९९२ रोजी पतसंस्थांची पायाभरणी झाली. तेथून पतसंस्थांचा प्रवाह या तालुक्यात सुरू झाला. त्यानंतर एकामागून एक अशा पतसंस्था स्थापन झाल्या. तालुक्याबाहेरच्या मोठ्या पतसंस्था व नागरी बँकांनी येथे शहरात शाखा सुरू केल्या आहेत. शहराची लोकसंख्या १५ हजारांच्या जवळपास आहे. १५ हजार लोकसंख्या असलेल्या या शहरामध्ये ८ ते १० पतसंस्था आहेत. तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख एवढी आहे. तालुक्यात सध्या १८ ते २० पतसंस्था कार्यरत आहेत. यातील काही पतसंस्था लोकांच्या विश्वासाला पात्र ठरल्या. सहकारी चळवळीच्या माध्यमातून ग्रामीण विकासाची पायाभरणी करता येते. त्यासाठी शासनाने धोरणांत सकारात्मक बदल करण्याची गरज असून या संस्थांनी आता उद्योगनिर्मितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.