चंद्रपूर : देशातील कोणत्याही व्याघ्र प्रकल्पात खुल्या जिप्सीद्वारेच पर्यटन केले जाते. परंतु, वन्यप्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यापुढे उघड्याऐवजी बंदिस्त जिप्सीतूनच पर्यटनाचा आनंद घ्यावा लागणार आहे. ताडाेबा व्यवस्थापनाने या सफारी जिप्सीसाठी तज्ज्ञांकडून डिझाईन मागविले असून २० डिसेंबरपर्यंत डिझाईन पाठविण्याची मुदत दिली आहे.
ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना हमखास व्याघ्र दर्शन होते. त्यामुळे या व्याघ्र प्रकल्पाची ख्याती देश-विदेशात पोहोचली. दरवर्षी हजारो पर्यटक येथे सफारीचा आनंद लुटतात. गेल्या २० ते २५ वर्षांत बहुतेक व्याघ्र प्रकल्पांच्या परिसरातील गावांमध्ये मानव- वन्यजीव संघर्षात चिंताजनक वाढ झाली आहे. परंतु, प्रत्यक्ष व्याघ्र प्रकल्पात जिप्सीतील पर्यटकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या नाहीत. पर्यटकांसह जिप्सीचालक, पर्यटक व मार्गदर्शकांकडून नियमांचे उल्लंघन केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात एक महिला वनरक्षक ठार झाल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनात खळबळ उडाली. सफारी सुरक्षित करण्यासाठी व्यवस्थापनाने जिप्सींना सुरक्षाकवच पुरविण्याचा निर्णय घेतला. ही जिप्सी खुली न राहता बंदिस्त ठेवून त्यादृष्टीने अधिकाधिक सुरक्षित ठेवण्याचे पाऊल उचलण्यात आले.
सर्वोत्कृष्ट डिझाईनला देणार २५ हजारांचा पुरस्कार
ताडोबा व्यवस्थापनाने देशभरातील तज्ज्ञांकडून डिझाईन मागविले आहेत. एक हजार रुपयांच्या ड्राफ्टसह हे डिझाईन २० डिसेंबर २०२१ पर्यंत संकेतस्थळावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त डिझाईन निवड समितीसमोर ठेवून त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. सर्वोत्कृष्ट डिझाईनला २५ हजारांचा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.