दुसऱ्या दिवशीही मोहीम : दुर्गापुरातील खासगी जागेवर अतिक्रमण दुर्गापूर : वैयक्तीक मालकी हक्काच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन गुरूवारी दुसऱ्या दिवशी उर्वरित झोपड्या भुईसपाट करण्यात आल्या. येथील वॉर्ड क्र. तीन मध्ये सत्यवान बेंडलेच्या मालकीच्या जमिनीवरील बुधवारपासून अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. चोख पोलीस बंदोबस्तात तीन जेसीबी मशीनच्या सहाय्याने २० झोपड्या हटविण्यात आल्या. परंतु गुरुवारी सकाळपासूनच या कारवाईला सुरुवात झाली. यात तब्बल ६५ ते ७५ झोपड्या हटविण्यात आल्या. सर्वे क्र. ११६ मधील ०.९५ हेक्टर जमिनीवरील एकूण ८५ ते ९० झोपड्य हटविण्यात आल्या. गत अनेक वर्षापासून झोपड्याचा वाद न्यायालयात सुरु आहे. अखेर उच्च न्यायालयाने जमीन मालकाच्या बाजूने निर्णय दिल्याने कित्येक वर्षापासून झोपड्या बांधू वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे या जमिनीवरील सारे अतिक्रमण हटवून जागा मोकळी करण्यात आली आहे. ही एक या हद्दीतील मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. पहिल्या दिवशीही मोहिम राबवून झोपड्या भुईसपाट करण्यात आल्या होत्या. आज दुसऱ्या दिवशीही मोहीम राबविण्यात आली. (वार्ताहर)
अतिक्रमित ९० झोपड्या भुईसपाट
By admin | Published: April 28, 2017 12:44 AM