हटविण्याची मागणी : गर्भश्रीमंतांनी केला कब्जा नागभीड/तळोधी (बा.) : तळोधी, आलेवाही, आणि मेंढा (उश्राळ) येथील नर्सरीच्या जागेवरच गर्भश्रीमंत लोकांनी अतिक्रमण केले असून बोंडप्रमाणेच हे अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी आहे. काही वर्षांपूर्वी तळोधी, आलेवाही आणि मेंढा (उश्राळ) येथे वन विभागाने रोपवाटिका तयार केल्या होत्या. या रोपवाटिकांमध्ये बांबू, साग, कडूलिंब, बिव्हला आदी विविध प्रकारच्या झाडांच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली होती. या नर्सरीची तीन- चार वर्षे वन विभागाकडून निगाही राखण्यात आली. ही रोपे चांगली वाढल्यानंतर वन विभागाने या नर्सरीकडे दुर्लक्ष केले. नेमकी हीच संधी साधून काही गर्भश्रीमंत लोकांनी या नर्सऱ्यांवर अतिक्रमण करून ही संपूर्ण जमीन हडपली आहे. हे अतिक्रमण होत असताना तत्कालिन वन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे सारे घडून आल्याची चर्चा आहे. यामुळे रस्ते व पायवाटीसुद्धा कायमच्या बंद झाल्या आहेत. या अतिक्रमणाने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. परिसरातील गुरांना आता चराईसाठी जागाच उरली नाही. या निमित्ताने निर्माण झालेली ही प्रमुख समस्या असून रानटी प्राण्यांचा गावाकडे मोठ्या प्रमाणावर ओघ वाढला आहे. ही या निमित्ताने दुसरी मोठी समस्या निर्माण झाली आहे. शिवाय लाखो रुपये किंमतीची वनसंंपदाही नष्ट करण्यात आली आहे. शासन पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, यासाठी दरवर्षी वनसंपदा जगविण्यासाठी करोडो रुपये खर्च करीत आहे. यावर्षीसुद्धा दोन कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवून लोकांचे लक्ष्य या समस्येकडे वेधले होते. मात्र त्याचवेळी शासनाचे वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष्य केले. त्यामुळेच हे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले, असे आता लोक खुले आम बोलत आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वर उल्लेख केलेल्या तिन्ही ठिकाणचे अतिक्रमण पाच- दहा एकरांतील नाही तर तब्बल ७० ते ८० हेक्टर क्षेत्रात असल्याचे समजते. उल्लेखनीय बाब अशी की, मागील वर्षी तळोधी येथील काही जागृत नागरिकांनी तळोधीच्या वनाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. पण त्या अधिकाऱ्याने याकडे पार दुर्लक्ष केले. वेळीच या अतिक्रमणाला पायबंद घातला असता तर हे अतिक्रमण वाढले नसते, असेही यासंदर्भात बोलले जात आहे. तळोधी येथे नुकत्याच रुजू झालेल्या वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी बोंंड येथील अतिक्रमण ज्या प्रकारे हटविले त्याचप्रमाणे हे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी आहे. (लोकमत चमू) या अतिक्रमणाने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. गुरे चराईचा प्रश्न निर्माण झाला आहे. जंगली प्राणी गावाकडे येत आहेत. हे अतिक्रमण त्वरीत हटवावे व समस्या निकाली काढाव्यात. - दिनकर पाकमोडे सचिव, भाजपा व माजी ग्रा.पं. सदस्य, तळोधी
तळोधी, आलेवाही, मेंढ्यात वन जमिनीवर अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2016 1:35 AM