मुख्य प्रवाह बदलविला: अतिक्रमण हटविण्यासाठी आयुक्तांना निवेदन
चंद्रपूर : येथील तुळशीनगराशेजातून वाहणाऱ्या तसेच सीटीपीएसकडून येणाऱ्या नाल्यावर काही प्लाटधारकांनी अतिक्रमण केले असून नाल्याचा प्रवाहच बदलविला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसामध्ये या नाल्याला पूर येऊन वसाहतीमध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवून नाला पूर्ववत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त तसेच सीटीपीएस प्रबंधकांना निवेदन देण्यात आले आहे.
चंद्रपूर-नागपूर मार्गावरील तसेच सीटीपीएसकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुळशीनगर वसाहत आहे. या वसातहीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु आहे. दरम्यान, वसाहतीच्या शेजारून सीटीपीएसक़डून येणारा नाला वाहतो. या नाल्याचा बाराही महिने पाणी असते. दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी नव्याने ले-आऊट टाकण्यात आला आहे. यासाठी नाल्यावर अतिक्रमण करून त्याचा प्रवाह बदलविण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे भविष्यात या परिसरात पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्वरित दखल घेऊन सदर नाल्यावरील अतिक्रमण हटवावे, अशा मागणीचे निवेदन येथील शिवसेना महिला जिल्हा संघटिका कुसुम उदार यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. यासंदर्भात सीटीपीएस प्रशासनालाही निवेदन देण्यात आले आहे.
--