चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला तसेच फळांचा बाजार भरतो. या ठिकाणी व्यापारी ठोकमध्ये भाजीपाला तसेच फळे घेऊन लहान व्यावसायिकांना विकतात. मात्र मागील काही दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असून, वाट्टेल तिथे आपला माल उतरवून इतरांना अडचणीत आणत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील अतिक्रमणावर आळा घालावा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
कोरोना संकटामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊन केले. दरम्यान, सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहतात. त्यामुळे साहजिकच येथे व्यावसायिक तसेच ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. परिणामी सोशल डिस्टन्सचाही येथे फज्जा उडत आहे. विशेष म्हणजे, बाहेर गावातून ट्रकद्वारे येथे भाजीपाला येतो. मात्र व्यापारी वाट्टेल तिथे भाजीपाला उतरवून इतरांना अडचणीत आणत आहेत. त्यातच काही लहान व्यावसायिकही जागा मिळेल तिथे बसून भाजीपाला विक्री करीत आहेत. त्यामुळे वाहने तसेच ग्राहकांना जाण्यासाठी जागाच नसल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे. जो-तो आपल्या सोयीनुसार येथे भाजीपाला उतरवित असून, वाट्टेल तिथे विक्री करीत असल्यामुळे बाजारात एकसूत्रता दिसत नसून, ग्राहकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन होणारे अतिक्रमण तसेच ग्राहकांचा त्रास कमी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बाॅक्स
दाताळा रस्त्यावरही विक्री
मागील काही दिवसांपासून चंद्रपूर ते दाताळा या मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात काही लहान व्यावसायिक रस्त्याकडेला बसून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विकत आहेत. परिणामी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भाजीपाला विकावा, मात्र रस्त्यावर न बसता खुल्या जागेत बसावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समिती तसचे महापालिकेचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.