चंद्रपूर : बाबूपेठ, लालपेठ परिसरात काही व्यावसायिकांनी रस्त्यावर दुकाने लावून अतिक्रमण केले आहे. अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी महानगर पालिकेकडे काही दिवसांपूर्वी केली होती. यासंदर्भात निवेदनही दिले आहे. मात्र, कारवाई झाली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.
न. पं. ने स्वच्छता मोहीम सुरू करावी
गोंडपिपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगर पंचायतने शहरात फॉगिंग मशीनने डास प्रतिबंधात्मक फवारणी केली. मात्र, आता पुन्हा डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नगर पंचायतीकडून प्रभागात घनकचरा व नाल्यांची सफाई करण्यात आली. परंतु, काही प्रभागात कचऱ्याचे ढिगारे आहेत. यातून डासांची उत्पत्ती होत आहे. नगरपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन डास निर्मूलन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
डास प्रतिबंधक फवारणी करावी
पोंभुर्णा : तालुक्यातील अनेक गावांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायतींची अर्थव्यवस्था नाजूक झाली. अशा स्थितीत स्वबळावर डास प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली नाही. त्यामुळे पंचायत समितीने ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अंचलेश्वर वाॅर्डातील नाल्यांची स्वच्छता करा
चंद्रपूर : अंचलेश्वर वाॅर्डात विविध ठिकाणी कचरा साचला आहे. नाल्यांचा उपसाही संथगतीने सुरू आहे. त्यामुळे मनपाने स्वच्छतेची गती वाढवावी. शिवाय, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
निधीअभावी अंतर्गत रस्ते बांधकाम ठप्प
चिमूर : तालुक्यातील सुमारे १५ गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मात्र, निधी न मिळाल्याने कामे रखडली आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये पंचायत समितीने ग्रामपंचायतला पत्र पाठवून निधी देण्याचे मान्य केले होते.
ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत
भद्रावती : तालुकास्थळाला जोडणाऱ्या ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला आहे. याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघात होत असल्याने पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे..
रस्त्यावरील पार्किंगमुळे नागरिक हैराण
मूल : गांधी चौक परिसरात रस्त्यावर वाहने पार्किंगसाठी ठेवली जातात. काही दिवसापूर्वी नगर परिषदेने दंडात्मक कारवाई केली होती़ पण कोरोना संसगार्पासून कारवाई थंडावली़ या मार्गावर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहनधारक व सर्वसामान्य नागरिकांना मार्गक्रमण करताना त्रास होत आहे.
सिमेंट रस्त्याची कामे त्वरित पूर्ण करा
नागभीड : तालुक्यातील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. पण ग्रामपंचायतींना बांधकामाचा निधी न मिळाल्याने कंत्राटदार हैराण आहेत. काही कामे कासवगतीने सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी निधीसाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्याची गरज आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
जिवती : अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.