चंद्रपूर : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीम १० ते २३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ही मोहीम जिल्ह्यातील १० तालुक्यांत राबविण्याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या. त्यामुळे यंत्रणांनी या अभियानाची जिल्ह्यात १०० टक्के प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. जि. प. जनपद सभागृहात जिल्हा समन्वय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, शिक्षणाधिकारी (मा.) कल्पना चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. संदीप गेडाम, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, हत्तीरोगाच्या निर्मूलनासाठी जिल्ह्याचा मास्टर प्लॅन तयार करावा. हत्तीरोगाचे रुग्ण अधिक आहेत असे तालुके व बाधित गावांची यादी तयार करावी. सार्वत्रिक औषधोपचार मोहीम प्रभावी राबविणे, हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेत लोकसहभाग वाढविणे, मोहिमेपूर्वी तालुकास्तरावर तालुका समन्वय समितीमार्फत बैठक घेणे, मोहिमेची व्यापक जनजागृती करून मोहीम १०० टक्के यशस्वी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन्सन यांनी बैठकीत संबंधित यंत्रणांना दिल्या.
असे आहेत तालुके
क्युलेक्स नावाचा डास चावल्याने हत्तीरोग आजार होतो. चंद्रपूर जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे. धानाचे उत्पादन जास्त असलेल्या तालुक्यांमध्ये हत्तीरोगाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येतात. मोहीम जिल्ह्यातील चंद्रपूर ग्रामीण, भद्रावती, राजुरा, पोंभुर्णा, गोंडपिपरी, मूल, सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी व चिमूर तालुक्यात राबविण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान नागरिकांनी आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दिलेल्या गोळ्या त्यांच्यासमोरच खाव्यात व ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.