वरोरा (चंद्रपूर) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वरोरा येथे कार्यरत एका सहायक अभियंत्याला सोमवारी सहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कार्यरत सहायक अभियंता श्रीणू बाबू चुक्का यांच्याकडे तक्रारदाराने सौरऊर्जेचा विद्युत संच लावण्याकरिता डिमांड काढण्याची विनंती केली. वरोरा येथील तक्रारदार सौरऊर्जेचे उपकरण लावण्याचे काम करतो. चुक्का यांनी या कामाकरिता सहा हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नागपूर यांच्याकडे तक्रार नोंदविली. सोमवारी दुपारच्या सुमारास चुक्का यांनी स्वतःच्या कार्यालयात तक्रारदाराकडून लाच घेतली असता, आधीच सापळा रचलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आणि कारवाई केली.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलीस उपायुक्त राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक मधुकर गिते, तसेच अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, कार्यालयीन कर्मचारी नरेश ननावरे, रविकुमार ढेंगळे, राकेश जांभूळकर, वैभव गाडगे व सतीश सिडाम यांनी केली.