पहिली ते चवथी : यावर्र्षींपासून शैक्षणिक सत्र प्रारंभचंद्रपूर: महानगरपालिकेच्या शाळांनी सध्या कात टाकणे सुरू केले आहे. मराठी शाळांचे अंधारात जात असलेले भविष्य बघता यावर्षीपासून मनपाने आपल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, मनपाच्या या इंग्रजी शाळांना विद्यार्थीही मिळणे सुरू झाले आहे.चंद्रपुरात नगरपालिका अस्तित्वाल आल्यानंतर जिल्हा परिषदेसारख्या पालिकेतर्फे विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडण्यात आल्या. या शाळांना तेव्हा सुगीचे दिवस होते. प्रत्येकजण जिल्हा परिषद किंवा नगरपालिकांच्याच शाळांमध्ये शिक्षण घ्यायचे. मात्र कालांतराने जिल्ह्यात काही ठिकाणी खासगी शाळा सुरू झाल्या. या खासगी शिक्षण संस्थांनी नवनवे अभ्यासक्रम सुरू केले. त्यामुळे सधन पालकांचा कल या खासगी शाळांकडे वाढू लागला. कालांतराने मध्यमवर्गीयदेखील खासगी शाळांकडे वळू लागले. चांगल्या निकाल देणाऱ्या शाळा म्हणून खासगी शाळांकडे बघितले जाऊ लागले. त्यामुळे नगरपालिकांच्या शाळेतील विद्यार्थी कमी होऊ लागले. अलिकडच्या काळात इंग्रजी माध्यमाचे फॅड वाढले आहे. शहरात कान्व्हेंट संस्कृतीचा बोलबाला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही, हे कळून आल्यामुळे प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंटमध्ये दाखल करीत आहे. अवाढव्य खर्च वाढला असला तरी पालक तो करताना दिसत आहे. या कान्व्हेंट संस्कृतीमुळे मनपाच्या शाळांना उतरती कळाच लागली. मागील पाच वर्षात तर या शाळांची स्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. अनेक शाळा दहा ते बारा विद्यार्थ्यांवरच सुरू आहे. मनपाला शाळांचा खर्च पेलवत नसल्याने सोई-सुविधा पुरविणेही मनपाने बंद केले आहे. त्यामुळे पटसंख्या कमालीची घसरली आहे. महात्मा गांधी प्राथमिक शाळा आणि कस्तुरबा गांधी प्राथमिक शाळा तर महानगरपालिकेला बंद कराव्या लागल्या.या सर्व प्रकारामुळे आणि स्पर्धेच्या युगात टिकता यावे म्हणून महानगरपालिकेने आता आपल्याच शाळांमध्ये सुधार करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा आता आपल्या शाळांमधून इंग्रजी माध्यमाचे धडे देणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर चार शाळांमधून इंग्रजी माध्यम सुरू केले आहे. यावर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. इयत्ता पहिलीतील २० ते २५ विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेशही घेतला आहे. (शहर प्रतिनिधी)
मनपा शाळेत इंग्रजीचे धडे
By admin | Published: June 23, 2014 11:46 PM