लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: लोकसभेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीच्या पहिल्या दीड तासात भाजपचे हंसराज अहीर यांना १०६७० मते मिळाली आहेत तर काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांना ८७३४ मते पडली आहे. वंचितचे राजेंद्र महाडोळे यांना १२५९ मतांवर समाधान मानावे लागले आहे. आकडेवारी समोर असली तरी सुरेश धानोरकर यांनी आपण आघाडीवर असल्याचा दावा केला आहे.चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासूनच मतांची गणिते मांडणे सुरू झाले होते. काँग्रेसने तगडा उमेदवार मैदानात उतरविल्यास भाजपसमोर कडवे आव्हान उभे करता येणे शक्य आहे, असा सूर होता. तर काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून दररोज नवे नाव समोर येत होते.मात्र काँग्रेसश्रेष्ठी उमेदवाराबाबत ठाम नसल्यामुळे मतदार संभ्रमात पडले होते. चर्चेत नसताना अचानक विशाल मुत्तेमवार यांचे नाव पुढे आले. या नावारून जिल्ह्यातील गटबाजी उफाळून आली. आशिष देशमुख, विनायक बांगडे यांची नावे चर्चेत होतीच. मुत्तेमवार यांचे नाव मागे पडून अचानक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून विनायक बांगडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. बांगडे यांच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले होते. मात्र ते अल्पकाळाचे ठरले. विशाल मु्त्तेमवारांसारखाच बांगडे यांच्या नावालाही कडवा विरोध झाला. अखेर सुरूवातीपासून काँग्रेसच्या तिकीटावर डोळा ठेवून असलेले सुरेश धानोरकर यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब करीत बांगडे यांचे नाव यादीतून वगळले. यामुळे बांगडे यांच्याशी जुळलेला एक मोठा गट नाराजीचा सूर काढत राहिला. अखेरच्या क्षणापर्यंत ही नाराजी कायम होती. प्रचारातही एक गट कायम अंतर ठेवून होता.
चंद्रपूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९; हंसराज अहीर आणि सुरेश धानोरकर यांची वाटचाल मागेपुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 9:45 AM