कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत विचारविनिमय सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जर शिक्षकांचे लसीकरण १०० टक्के पूर्ण झाले असते, तर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला अधिक बळकटी मिळाली असती.
बॉक्स
केवळ ८१ टक्के लसीकरण
चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषदेच्या सर्व व्यवस्थापनांच्या शिक्षकांची संख्या १२ हजार २२३ आहे. त्यांपैकी आतापर्यंत ९९८० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे; दोन हजार २४३ जणांचे लसीकरण अद्यापही बाकी आहे. विविध कारणे दाखवून शिक्षक लसीकरण टाळत आहेत.
बॉक्स
लसींचा तुटवडा
जिल्ह्यात लसींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. अनेक केंद्रे लसींअभावी बंद असल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेकांना लसीकरणासाठी गेल्यापावली परत जावे लागते. याचा फटका लसीकरणावर पडत आहे. त्यामुळे लसीचा पुरवठा मोठ्या प्रमाणात करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
बॉक्स
चिमूर तालुक्यात शिक्षकांचे सर्वांत कमी लसीकरण
चिमूर तालुक्यात शिक्षकांची संख्या १२६५ आहे. त्यांपैकी ७३४ जणांनी लसीकरण घेतले आहे. ही टक्केवारी केवळ ५८.०२ टक्के आहे. त्यानंतर बल्लारपूर ६२.८१ टक्के, शिक्षणाचे माहेरघर समजले जाणारे ब्रह्मपुरी ६३.३७ टक्के, कोरनपा ७२.५१ टक्के लसीकरण झाले आहे; तर भद्रावती तालुक्यात सर्वाधिक ९७.७५ टक्के, चंद्रपूर ९७.२८ टक्के, सिंदेवाही ९४.१२ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.