चंद्रपूर : महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पाच दिवसांपासून पर्यावरणपूरक विसर्जन सुरू आहे. आतापर्यंत एकही पीओपी मूर्ती आढळून आली नाही. १४ सप्टेंबरच्या रात्री १२ अखेरपर्यंत ३ हजार ९५६ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन पार पडले. विसर्जन आपल्या दारी उपक्रमात ६० गणेशभक्तांनी फिरत्या कृत्रिम विसर्जन कुंडांचा लाभ घेतला.
चंद्रपूर मनपाच्यावतीने यंदा पर्यावरणपूरक उत्सवावर भर देण्यात आला. त्यासाठी शहरात २७ ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड व १९ निर्माल्य कलश ठेवण्यात आले. झोन क्रमांक १ मध्ये मनपा झोन कार्यालय, संजय गांधी मार्केट नागपूर रोड, डॉ. बाबा आमटे अभ्यासिका, दाताळा रोड, इरई नदी, तुकुम प्रा. शाळा (मनपा, चंद्रपूर), झोन क्रमांक- २ मध्ये गांधी चौक, लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा पठाणपुरा रोड, समाधी वार्ड, शिवाजी चौक, अंचलेश्वर रोड, विठोबा खिडकी, विठ्ठल मंदिर वाॅर्ड, रामाळा तलाव, हनुमान खिडकी, महाकाली प्राथमिक शाळा, महाकाली वार्ड, झोन क्रमांक ३ मध्ये नटराज टाॅकीज (ताडोबा रोड), सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा बाबुपेठ, मनपा झोन कार्यालय, मूल रोड, बंगाली कॅम्प चौक आदी ठिकाणी कृत्रिम विसर्जन व्यवस्था
करण्यात आली आहे.
बॉक्स
इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी यंदा महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धा घेण्यात येत आहे. यात घरगुती गणेश उत्सव व सार्वजनिक गणेश मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेचे मूल्यमापन १७ सप्टेंबर रोजी होईल.
बॉक्स
८३० गणेशभक्तांना जास्वंद रोपटे भेट
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून मनपाच्या कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जन करणाऱ्या ८३० गणेशभक्तांना जास्वंदाचे रोपटे आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले जात आहे. आतापर्यंत रामाळा तलाव व इरई नदी परिसरामध्ये विसर्जन करण्यासाठी आलेल्यांनी या कृत्रिम कुंडाचा लाभ घेतला.