ब्रह्मपुरी : तालुक्यातील ब्रह्मपुरीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या चांदगावात तापाची लागण झाली असून त्यात एकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव दहशतीखाली आले आहे. गावातील ७५ टक्के लोक तापाने फणफणत आहेत. भोजराज गोविंदा ठोंबरे (३३) यांचा या आजारात मृत्यू झाला. चांदगावात १०० घरे असून जवळजवळ ४०० ते ५०० नागरिक वास्तव्याला आहेत. या गावाला बोअरवेल व विहिरीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. येथे नाल्यांची सफाई अर्धवट करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी व नाली सफाई व्यवस्थित न झाल्याने मागील दोन दिवसांपासून रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. पाहता-पाहता ७५ टक्के नागरिकांना आजाराची लागण झाली आहे. याबाबत माहिती मिळताच, चौगान प्राथमिक आरोग्य केंद्राची चमू चांदगावात दाखल झाली. या चमूने रुग्णांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी गोळा केले असून रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून गावातील शालू बाजीराव खुळसिंगे (४०), स्वाती बाजीराव खुळसिंगे (१७), धर्मराज सदाशिव अमृतकर (४५), पर्वता धर्मराज अमृतकर, अविनाश धर्मराज अमृतकर यांच्यासह गावातील १० पेक्षा अधिक रुग्णांना ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. भोजराज गोविंदा ठोंबरे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने गाव भयभयीत झाले आहे. मृत भोजराजला अवघ्या दिड वर्षांचा मुलगा आहे. या गावात फेरफटका मारला असता, गावातील आबालवृद्ध खाटेवर तापाने खिळून आहेत. चौगान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चमू व्यतिरिक्त कोणत्याही जिल्हास्तरावरील चमूने वा लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. गावात तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक पाठवावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
चांदगावात तापाची लागण, एकाचा मृत्यू
By admin | Published: July 13, 2015 1:08 AM