रवी रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : खंडाळा येथील युग अशोक मेश्राम या दोन वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून बळी गेला, तर एका महिलेचा संशयाच्या भूतावरुन पतीनेच बळी घेतला. गेल्या पंधरा दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्याकडे लक्ष वेधणाऱ्या या दोन्ही घटना मानवी मन सुन्न करणाऱ्या आहेत.वैज्ञानिक युगात जगत असताना दोन वर्षीय मुलाचा बळी जातो. या घटनेवरून पूर्वापार मानगुटीवर बसून असलेले अंधश्रद्धेचे भूत अजूनही उतरले नाही याचाच हा पुरावा म्हणावा लागेल. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरीला शिक्षणाची पंढरी म्हटले जाते. या घटनेने शिक्षणाच्या पंढरीला खाली पहायला लावले आहे. खरे म्हणजे मानवी विकृतीने आपले खरे रूप दाखविले असे म्हणावे लागेल. ही विकृतीचा जात, धर्म, पंथाशी कवडीचाही संबंध नसतो. झटपट श्रीमंत होण्याची लालसा मनुष्याला कोणत्या थराला नेते याचे हे उदाहरण आहे. युगचा बळी घेऊन ते श्रीमंत झाले का? हा खरा प्रश्न आहे. मात्र युगचा यामध्ये नाहक बळी गेला. त्या चिमुकल्याचा काय दोष होता? मनुष्याचा जन्म त्याच्या हातात नसतो. तो पायाळू आहे. त्याच्या डोक्यावर तीन भोवरे आहे. हे त्या निष्पाप बालकाला काय माहिती? पायाळू मुले, डोक्यावर तीन भोवरे असलेली मुले आपल्याला झटपट श्रीमंत करू शकतो. हे भूत त्या क्रूरकर्म्याच्या डोक्यात ज्यांनी घातले. त्याचा शोध घेऊन त्याने आतापर्यंत किती निष्पाप बालकांचा बळी घेतला? हे पोलिसांनी शोधण्याची गरज आहे. त्याने असे कृत्य यापूर्वी केले नसेल तर त्याला कोणतरी हे कृत्य करायला भाग पाडले. त्याचाही शोध घेऊन त्यांनी यापूर्वी असे कृत्य केले का? याचाही शोध घेतल्यास पोलीस या प्रकरणाच्या खोलात जावू शकतात. युगच्या निमित्ताने हे अघोरी मांत्रिक शोधण्याची हीच खरी वेळ आहे.याप्रकरणाने लहानमुले असुरक्षित असल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली. त्यांना भयमुक्त करण्यासाठी पोलिसांनी या मांत्रिकांचा मांत्रिक हडकून काढले तरच युगला न्याय मिळेल. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी समस्त ब्रह्मपुरीच नव्हे तर ज्यांच्यापर्यंत ही घटना पोहचली त्या प्रत्येकांना असे वाटणे स्वाभाविक आहे. यासोबतच जिथेजिथे अशी अघोरी कृत्य करणारे मांत्रिक मनुष्यातील लालसा जागृत करतो. त्याच्या मनात अंधश्रद्धेचे बिजारोपण करून असे क्रूरकर्म करायला भाग पाडतात. अशा मांत्रिकांना पोलिसांनी धडा शिकविण्याची गरज घटनेनंतर प्रत्येकांना वाटू लागली आहे. याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे जनतेनेही यापुढे अशा मांत्रिकांबाबत लगेच पोलिसांना अवगत केल्यास अशा घटनांचा पर्दाफाश केला जाऊ शकते.
खंडाळ्यातील ‘युग’ अंधश्रद्धेच्या भुताचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 11:08 PM