संदीप बांगडे
सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील नवोदय विद्यालय तळोधी बा. येथील शिक्षण घेणाऱ्या बारावी सीबीएसई दिल्ली बोर्ड परीक्षेचा निकालात मूल्यमापन त्रुटी असल्याने ४६ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता नामांकित ठिकाणी पुढील प्रवेश मिळणे कठीण झाले आहे.
जिल्ह्यातील नवोदय विद्यालय तळोधी (बा.) येथील २०२०-२१ इयत्ता बारावी सीबीएसई परीक्षेचा निकाल ३० जुलैला जाहीर झाला. बोर्डाची परीक्षा कोविड प्रभावामुळे रद्द झाली होती. भारत सरकार नियोजनानुसार बारावी निकालाचे मूल्यमापन ३० ३० ४० या गुणसूत्रांचे आधारानुसार करून निकाल जाहीर केले जातात. परंतु ४६ विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन निकालात त्रुटी असल्याने नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांकडे त्रुटी असल्याची तक्रार केली आहे. आमची चूक नाही आम्ही बोर्डाच्या संपर्कात आहोत, सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम आहे, अशी उत्तरं पालकांना मिळाली. निकाल जाहीर होऊन एक महिना झाल्याने पालक वर्ग मानसिक तणावात आहेत. विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा देण्याची सक्ती केली जात आहे. निकालात मूल्यमापनाची त्रुटी आढळल्याने पुढील शिक्षणासाठी प्रवेश नामांकित ठिकाणी घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. मूल्यमापनात झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्याकरिता पालकांनी नवोदय विद्यालय तळोधी बाळापूर येथील प्राचार्य, केंद्रीय शिक्षणमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
कोट
नवोदय विद्यालयात ग्रामीण भागातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी आहेत. मूल्यमापनातील त्रृटीमुळे बारावीनंतरच्या शिक्षणाकरिता नामांकित ठिकाणी प्रवेश मिळणे कठीण झाले असल्याने निकालातील मूल्यमापनात असलेल्या त्रुटी दुरुस्त करून गुणपत्रिका मिळावी.
- प्रशांत खोब्रागडे, पालक
कोट
सीबीएसई बोर्डाची चुकी असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, विद्यार्थांचा निकालाचा निर्णय आल्यानंतर पालकांना कळविण्यात येईल.
- मीना, प्राचार्य
नवोदय विद्यालय तळोधी (बा.)