लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात पोलीस स्टेशन स्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मंगळवारी सकाळी ११ वाजता प्रियदर्शिनी सभागृहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अंजली घोटेकर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, पोलीस उपअधीक्षक (गृह) मारोती इंगवले, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा, प्रताप पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी मूल विशाल हिरे आदी उपस्थित होते. यावेळी विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.प्रथम पुरस्कार विश्वज्योती कॉन्व्हेंट तळोधी येथील मयुरी विष्णुदास उईके, द्वितीय जि. प. हायस्कुल पाथरी येथील शेजल नरेंद्र मुळे, तृतीय वसंतराव नाईक विद्यालय कोरपना येथील प्राचिता जमदाळे हिने पटकाविला. यावेळी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सहभाग दर्शविणाऱ्या हिरालाल लोया विद्यालय, वरोरा, लोकमान्य विद्यालय वरोरा, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर यांना गौरविण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांपैकी एकूण १६० विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर गौरवचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.पोलीस व सामान्य जनता यांचे संबंध मैत्रीपूर्ण व्हावे, व विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांप्रती आपुलकीची भावना निर्माण व्हावी, यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी प्रास्ताविकातून सांगितले. जिल्ह्यातून सुमारे ७०० विद्यार्थी आणि शिक्षक वृंद कार्यक्रमाला उपस्थित होते. संचालन विकास मुंढे यांनी केले.
पोलीस विभागातर्फे निबंध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 10:10 PM