कोरपना : जिल्ह्यातील कोरपना व जिवती या दोनच तालुकास्थानी राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या स्थानी बँकेची शाखा स्थापन करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
कोरपना व जिवती येथे अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा - महाविद्यालय व मोठी बाजारपेठ आहे. परंतु, राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने त्यांना पाटण, वनसडी, गडचांदुर येथे जावे लागते आहे. यात व्यापाऱ्यांना जोखीम पत्करून सुरक्षित रक्कम त्या ठिकाणापर्यंत न्यावी लागते आहे. तालुका स्थानी राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने अनेक चलन तिथेच जाऊन भरावे लागते. त्यामुळे वेळ व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. येथे राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा स्थापन करावी, यासाठी अनेकदा निवेदने व अर्ज देण्यात आले. मात्र कुठलीही हालचाल होताना दिसून येत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.