कोरपना : तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्हा सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयाची दर्जावाढ करून उपजिल्हा रुग्णालयाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अबरार अली व रुग्णांकडून होते आहे.
कोरपना हे तालुक्याचे स्थान असल्याने येथे तालुक्यातील अनेक गावातून रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र येथील रुग्णालयात बऱ्याच सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना रेफर टू चंद्रपुर केले जाते. रुग्णालयात सद्यस्थितीत ३० खाटाचीच व्यवस्था असल्याने अधिक रुग्ण झाल्यास त्यांना जमिनीवर झोपूनच उपचार घ्यावे लागतात. रुग्णालयात बऱ्याच रोगाचे तज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांनाही दुसऱ्या रुग्णालयात उपचार घेण्यावाचून पर्याय उरत नाही. रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असल्याने येथील वातावरण आरोग्यदृष्ट्या पोषक नाही. त्यामुळे येथील स्वच्छता व परिसर सौंदर्यीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णालयात गरजेनुसार पाण्याची व्यवस्था नसल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच येथे अनेक आधुनिक उपचार यंत्र सामग्री उपलब्ध नाही. त्यामुळे थातुरमातुर उपचार करूनच जिल्हा रुग्णालयात रेपर होण्याखेरीज पर्याय उरत नाही. त्यामुळे येथे तज्ञ सह उपचार यंत्र पुरवण्याची गरज रुग्णांकडून व्यक्त होत आहे. कोरपना हे तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्यातील गावातील नागरिकांना सोयीचे व मध्यवर्ती ठिकाण पडत असल्याने येथे आरोग्यविषयक सुविधा वाढवणे अत्यंत गरजेची आहे. मात्र यावर अनेकदा लक्ष वेधून ही आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. रुग्णालयात पुरेसा वैद्यकीय स्टॉप नाही. तसेच तालुका पातळी वर आवश्यक असलेले तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय गडचांदूर येथे असल्याने कोरपणा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाहिजे तितके लक्ष देणे शक्य होत नाही. त्याचाही फटका रुग्णांना येथील असुविधामुळे बसतो आहे. करिता कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयाची दर्जावाढ करून उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करणे गरजेचे असल्याचे मत अली यांनी व्यक्त केले आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयही हलवा
तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथे तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय त्वरित हलविण्यात यावे. जेणेकरून तालुक्याचा आरोग्यविषयक कारभार एक केंद्री होईल. सर्व कार्यालय एका जागी राहल्याने काम काज ही जलद गतीने होणार. त्यादृष्टीने गडचांदूर वरून सदर कार्यालय कोरपना येथे हलविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.