चंद्रपूर : कोरोना हद्दपार करण्यासाठी १०० टक्के लसीकरण आवश्यक असून लोकसंपर्कात असलेल्या सेवापुरवठादारांची तपासणी केली जात आहे. जे आस्थापनाधारक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, अशा ठिकाणी लाल, तर संपूर्ण लस घेतलेल्या ठिकाणी हिरव्या रंगाचे स्टिकर लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी मनपाने पाऊल उचलले आहे. फेरीवाले, सेवा पुरवठादारांनी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दाखवावे, अन्यथा बाजारात प्रवेश न देण्याचा निर्णयही घेण्यात आला. औद्योगिक वसाहती, उद्योग समूह, खासगी कार्यालये या ठिकाणचे कर्मचारी, कामगारांनी किमान पहिला डोस घेतल्याचा पुरावा दाखविणे बंधनकारक आहे.
उद्योग समूहातील कामगारांना कामावर घेताना, मजुरांना काम देताना दोन डोस झाले आहे की नाही याची खात्री केली जात आहे. मनपाच्या झोननिहाय पथकाद्वारे लसीकरण प्रमाणपत्र तपासणी सुरू आहे. सर्वच झाेनमधील व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते, पाणीपुरी व इतर सर्व व्यापाऱ्यांना भेटी देऊन लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
शहरात लसीकरण करून घेण्याबाबत व्यापाऱ्यांना सूचना देऊन लेखी स्वाक्षरी घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या दुकानदार व कामगार यांनी लस घेतली नाही, असे तपासणीत आढळून आल्यास त्या दुकानावर लाल रंगाची स्टिकर लावणे सुरू झाले. या दुकानात काम करणाऱ्या लोकांनी कोविड १९ प्रतिबंधात्मक लस घेतली नाही, ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व जबाबदारीवर प्रवेश करावा, असा संदेश या स्टिकर्सच्या माध्यमातून देण्यात येत आहे.