लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एनपीए योजना रद्द करून शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखेच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी, दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून राज्य सरकारला अल्टिमेटम दिला.अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्याची शिफारस राज्य शासनाने करावी, कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन व उपदान अनुज्ञेय करावे, १४ टक्के अंशदान रक्कमेची वजावट आयकरासाठी वार्षिक उत्पन्नातून अनुज्ञेय करावी, ऑक्टोबर २००५ पूर्वीच्या सेवेचा राजीनामा देऊन नवीन सेवा स्वीकारलेल्या व नोव्हेंबर २००५ पूर्वी निवड होऊन उशिरा नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करण्याची मागणी संघटनेने केली. राज्य शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष दीपक जेऊरकर यांनी दिला. यावेळी अविनाश सोमनाथे, शालिक माऊलीकर, बंडू मेश्राम उपस्थित होते. चंद्रकांत कोतपल्लीवार, अमोल आखाडे, सीमा पाल, राजू धांडे, अरुण तिखे, शालिक माऊलीकर, सुचिता धांडे, सुनील दुधे आदींनी मार्गदर्शन केले. संचालन संतोष अतकारे यांनी केले. अनंत गहुकर यांनी आभार मानले. आंदोलनात महसूल, बांधकाम, पाटबंधारे, कोषागार, वनविभाग, वस्तू व सेवा कर, भूमीअभिलेख, कृषी, औद्योगीक प्रशिक्षण केंद्र, अभियांत्रिकी महाविद्यालय, भूविज्ञान-खनिकर्म, आरोग्य विभाग, पोलीस अधीक्षक कार्यालय कर्मचारी सहभागी झाले होते.