शिक्षकेतर आकृतिबंधानुसार वरिष्ठ व कनिष्ठ लिपिकांची २२ हजार ६०७ पदे निर्माण होणार असल्याचे शासन निर्णयात नमूद केले; परंतु चतुर्थश्रेणी पदभरतीला प्रतिबंध घालण्यात आला. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचारी संघटनांमध्ये असंतोष आहे. अनुदानित शाळांमध्ये २००५ पूर्वीच्या आकृतिबंधानुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती केली जात होती. या आकृतिबंधात सुधारणा करून नवीन पदे निर्माण करावी व त्यानुसारच सर्व शाळांमध्ये लागू करण्याची मागणी शिक्षकेतर कर्मचारी संघटना करीत आहेत.
असा आहे आकृतिबंध
१४ वर्षांपूर्वी तयार केलेल्या आकृतिबंधानुसार ५ ते १२ व्या वर्गात ५०० पटसंख्या असल्यास १ लिपिक, १००० पटसंख्या असल्यास १ पूर्णवेळ ग्रंथपाल, ९ ते १० वी पर्यंतच्या पटसंख्येकरिता १ प्रयोगशाळा सहायक आणि त्यापेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये २ सहायक मिळणार आहेत. त्यामुळे नवीन पदांचा मार्ग बंद झाल्याचा संघटनांचा आरोप आहे.