रत्नाकर चटप
नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील पकडगुड्डम धरण बांधून २५ वर्षे उलटली. मात्र, धरणाचे खोलीकरण अद्यापही झालेली नाही. त्यामुळे पायथ्याच्या लगतची शेती सिंचनापासून वंचित असलेली दिसून येत आहे.
जवळपास ११.७ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेले हे धरण १६४ हेक्टर क्षेत्रावर आहे. टेकड भाग असल्याने धरणात प्रत्यक्षात १०० हेक्टर क्षेत्रावरच पाणी साचलेले दिसून येते. धरणातील मुख्य कालव्याचे काम वगळता इतर लघु कालवे आजही स्वच्छ करण्यात आलेली नाहीत. शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणाऱ्या कालव्यामध्ये आता झुडपे वाढलेली असून, जागोजागी मातीचे ढिगारे साचलेले दिसून येत आहे. या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या इंजापूर, खैरगाव, सोनुरली, चिंचोली, पारंबा, दहेगाव, खिर्डी, पिपर्डा, लोणी, वडगाव, वनसडी आदी गावांसाठी शेतीला सिंचनाचे पाणी दिले जाते; परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक गावांना आजपर्यंत पाणी पोहोचलेले नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
साधारणपणे ३२४४ हेक्टर क्षेत्र या धरणामुळे सिंचनाखाली असल्याचे कागदोपत्री दिसते. यातच २००४ पासून अंबुजा सिमेंट कंपनीला तीन दशलक्ष घनमीटर इतके पिण्याचे पाणी या धरणातून नियमित दिले जात आहे. त्यामुळे १२६४ दशलक्ष घनमीटर शेतीक्षेत्र सिंचनापासून वंचित राहिलेले आहे. ११ लाख रुपये खर्च करून काही महिन्यांपूर्वी आच्छादन तयार करण्यात आले. मात्र, इतर कामे अद्यापही सिंचन विभागाने केलेली नाहीत. कोरपना तालुक्यातील अंमलनाला व पकडीगड्डम धरण शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी बांधण्यात आले; परंतु प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना शेतीसिंचनासाठी याचा लाभ होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हजारो हेक्टर शेतजमीन आजही सिंचनापासून वंचित आहे. आता खरीप हंगाम संपून रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे.
बॉक्स
रब्बी हंगामात पाण्याची मोठी गरज
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाण्याची गरज पडते. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होताना दिसते. धरणाच्या पाण्याचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. कोरपना तालुक्यात तीन हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्रावर यावर्षी कापसाचा पेरा आहे. यातच सोयाबीन पिकानंतर रब्बी हंगामात गहू, हरभरा यासारखी पिके घेतली जातात. कापूस हे प्रमुख पीक असल्याने या पिकासाठी पाण्याची मोठी गरज असते. तेव्हा धरणाची खोली करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
कोट
रब्बी हंगामाकरिता कालव्याचे खोलीकरण करणे व स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, संबंधित विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असून, धरणाचे खोलीकरण करून स्वच्छता करण्याची मागणी मी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.
-सय्यद आबीद अली, संस्थापक अध्यक्ष जनसत्याग्रह संघटना, कोरपना