नांदाफाटा : जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा होताच नागरिकांमध्ये सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात आला. मात्र महिना दोन महिन्यातच जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांचे पेव फूटले असून कोरपना तालुक्यातही अवैध दारू विक्री सुरू आहे. तेलंगाना व सीमेलगतच्या यवतमाळ, नागपूर जिल्ह्यातून दारूचा पुरवठा होत असल्याचे समजते.कोरपना तालुक्यालगतच्या तेलंगानातील बेला, आदिलाबाद मार्गे काही विक्रेते दुचाकी वाहनांमध्ये दारूची पुरवठा करीत आहे तर सीमेलगतच्या मेटीगुडा मार्गे रात्री दारूचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मेटीगुडा मार्गे घनदाट जंगल असून कोरपना ते मेटीगुडा जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. या मार्गावरुन वाहनांची वर्दळ नसते. याचा फायदा घेत दारूविक्रेते आपली संधी साधत आहे. रात्रीला दुचाकी वाहनावर दारूचा पुरवठा होत आहे. त्याचबरोबर तालुक्याील अनेक गावांमध्ये चिल्लर दारू विक्रेते घरातूनच काही नियमित ग्राहकांना दारू विकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. देशी दारूची एक बॉटल १२० ते १५० रुपये तर विदेशी दारू ३५० ते ४०० रुपयांपर्यंत विकली जात आहे. या तालुक्यात रोजच पोलीस प्रशासनामार्फत कुठे ना कुठे अवैध दारू विक्रेत्यांवर छापा घालून त्यांना ताब्यात घेतले जात आहे. मात्र दुसरीकडे अवैध दारूची चुणचुण कायम असून मद्यपी खुलेआम रस्त्यावरुन फिरताना दिसत आहे. कुठे शेताच्या बांधावर तर कुठे आडोशाच्या मार्गावरुन चिल्लर दारूची विक्री होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोडशी, परसोडा, सांगोडा, भोयगाव, आदी ठिकाणांवर पोलिसांची गस्त होती. यातही आता नदीला पाणी आल्याने काही मद्यपी नावेतूनही दारू आणून आपली तलब भागवित आहे. जिल्ह्यात सर्वत्र दारूबंदी असताना कोरपना तालुक्यात मात्र दारूचा वास येतोय, याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. तालुक्यातील गडचांदूर, कोरपना, नांदाफाटा, अंबुजाफाटा यासह सीमेलगतच्या अनेक गावात अवैध दारू विक्रेत्यामार्फत दारूची विक्री होत आहे. (वार्ताहर)
कारवाईनंतरही दारूविक्री सुरूच
By admin | Published: July 17, 2015 12:58 AM