मूल : शासनाने आधारभूत किंमत जाहीर करून शेतक-यांना बोनस जाहीर केल्याने कृषी उत्पन्न बाजार समिततीच्या आधारभूत केंद्रावर गर्दी वाढली. ५०० जणांनी ऑनलाईन नोंदणी केली. मात्र आतापर्यंत केवळ १७७ शेतक-यांकडूनच ६५८५.८५ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. त्यामुळे शेकडो ताटकळत शेतकरी संदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
शासनाने आधारभूत केंद्रात विक्री करणार्या शेतक-यांना ७०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धानाची किंमत१८६८ रुपये क्विंटल आहे. शेतक-यांना एका क्विंटलमागे २५६८ रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी आधारभूत केंद्रात धान आणण्यासाठी चढाओढ करीत असल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या आधार केंद्रात ४५८ शेतक-यांनी ५६,७४३.०३ क्विंटल धान विक्रीसाठी आणला होता. मात्र यावर्षी वातावरणातील बदल व रोगराईमुळे धानाची उतारी गतवर्षीपेक्षा कमी आहे. धान विक्रीसाठी आधारभूत केंद्रात येत असल्याचे बाजार समितीच्या आवारात वर्दळ आहे बघता दिसुन येते.जवळपास एक हजार शेतकर्याच्या पुढे शेतकरी धान आणण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ऑनलाइन नोदणी केल्यानंतर संदेश दिला जातो. पण आजही शेकडो शेतकरी प्रतीक्षेत करीत आहेत. मूल शहरात राईसमिलची संख्या बरीच असल्याने येथील तांदुळ मुंबईसह विदेशात निर्यात केली जाते. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने ४ मार्च २०२० च्या शासन निर्णयानुसार १८६८ रुपये क्विंटल भाव दिला जाणार आहे. त्यात ७०० रुपये बोनस मिळणार आहे. मात्र जे खरोखरच शेतकरी आहेत त्यांना लाभ मिळणे आवश्यक आहे. आड मार्गाने धान खरेदी करुन सात बारा नाममात्र जमा करणार्या दलालाला याचा फायदा होऊ नये यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचा-यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
कोट
आधारभूत किंमतीसोबतच ७०० रुपये बोनस जाहीर झाले. त्यामुळे मूल तालुक्यासोबतच चंद्रपूर तालुक्यातील शेतकरी केंद्रात धान आणत आहेत. ९५० शेतक-यांनी धान नोंदणीसाठी अर्ज कार्यालयातून नेले. नोंदणी केलेल्या प्रत्येक शेतक-याचे धान विकत घेण्यात येईल.
-चतुर मोहुले, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल