लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्तांची व मृत कर्मचाऱ्यांची देयके बराच कालावधीपर्यंत प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरच्या हक्काच्या मोबदल्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना तटपुंजे वेतन दिले जाते. तरीसुद्धा ते प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत असतात. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीसाठी काही रक्कम कपात केली जाते; परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतरही बऱ्याच कालावधीपर्यंत त्याची रक्कम दिली जात नाही. मागील वर्षी सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील अनेक कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची तसेच ग्रच्युइटीची रक्कम थकीत आहे. संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे स्वत:च्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहे. परिणामी, पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत; मात्र अद्यापपर्यंत महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत, ही रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही. तसेच रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जातात; मात्र मागील वर्षी निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना ही रक्कम अद्यापही मिळाली नाही.
नोकरीत असतानाही आणि निवृत्तीनंतरही फरफटपूर्वीच तटपुंजे वेतन दिले जात असल्याने नोकरी करतानाही आर्थिक ताण सहन करावा लागतो. सेवानिवृत्त झाल्यानंतरही आपल्या हक्काचे पैसे वेळवर मिळत नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोर जावे लागते.-चालक
इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे साहजिकच निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम कमी आहे. त्यातही ही रक्कम थकित राहत असून वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.- वाहक
स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांनाही समस्या कायमआरोग्याच्या समस्याने काही कर्मचारी सेवानिवृत्ती घेतात. त्या कर्मचाऱ्यांना त्वरीत लाभ देण्याचे अध्यादेश आहेत. मात्र सेवानिवृत्ती होऊन बराच कालावधी झाल्यानंतर लाभ देण्यात आला. कोरोनामुळे मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. सेवानिवृत्त झाल्याने त्यांचे उत्पन्न मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना त्वरीत लाभ देण्यात यावा, अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून होत आहे.