कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला ५० ते १०० केंद्र तयार केले होते. त्यानंतर केंद्र व राज्य शासनाकडून सूचना जारी झालेल्यानंतर उपलब्ध डोसनुसार केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ४५० केंद्र तयार करण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिका व जिल्ह्यातील केंद्रांमध्ये लस देण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन नियुक्त्या झाल्या. परंतु लस घेणाऱ्या प्राधान्य गटाच्या संख्येच्या तुलनेत डोस मिळत नाही. त्यामुळे चार दिवस लसीकरण सुरू ठेवल्यानंतर पाचव्या दिवशी केंद्र बंद ठेवण्याची वेळ जिल्हा आरोग्य यंत्रणेवर येत आहे. ग्रामीण भागातील बऱ्याच केंद्रांमध्ये लस उपलब्ध असतानाही नागरिक पुढे येत नाहीत. कोरोना लसीबाबत अजूनही बरेच गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी प्रशासनाने यंत्रणा तयार केली. मात्र, पावसाळ्यात हे आरोग्य पथक गावागावांत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे काही नागरिकांच्या मनातील शंका-कुशंका अजूनही दूर झाल्या नाही. शहरातील केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी नागरिक गर्दी करतात. पण दोन-तीन दिवस चकरा मारल्याशिवाय लस मिळत नाही, अशी स्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तालुकानिहाय लसीकरण
बल्लारपूर - ३१६३०
भद्रावती- ४००७९
ब्रह्मपुरी-३४७६२
चंद्रपूर ग्रामीण- ३४७३४
चिमूर- १७८९०
गोंडपिपरी- १८४५३
जिवती- ७९१३
कोरपना २८५६६
मूल- २८३६९
नागभीड २६२१०
पोंभूर्णा- १४६६४
राजुरा- ३२७९८
सावली-२२९६७
सिंदेवाही- २३४२८
वरोरा- ३७६३८
९२ हजार ९४८ जणांचा दुसरा डोस पूर्ण
चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील केंद्रात आतापर्यंत ९२ हजार ९४८ जणांनी दुसरा डोस घेतला. यामध्ये
४४ पुढील वयोगट, सहव्याधी व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरुवातील कोविशिल्ड लस दिली जात होती. त्यानंतर दोन महिन्यांनी कोव्हॅक्सिन लस उपलब्ध झाली. या लसीबाबतही काही गैरसमज पसरविण्यात आले होते. मात्र, जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेच्या जागृतीमुळे दूर झाले. आता कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.
४ लाख १२ हजार ४८५ जणांचा पहिला डोस
लस घेण्यास पात्र असणाऱ्या सर्व वयोगटातील ४ लाख १२ हजार ४८५ जणांना आतापर्यंत पहिला डोस घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील तरुणाईसाठी लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर युवक-युवतींचीही संख्या वाढली. मात्र, लसीअभावी अनेकांना आल्या पावली परत जावे लागते.