चंद्रपूर : २६ मे, २०२३ च्या शासन निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र विकास सेवा गट ‘अ’ व गट ‘ब’ संवर्गातील पद रिक्त असताना, पदाचा अतिरिक्त कार्यभार तेथील पंचायत समिती येथील सहायक गटविकास अधिकारी यांना देण्याचा नियम आहे. मात्र, भद्रावती पंचायत समिती येथे पदोन्नतीने गटविकास अधिकारी यांची बदली झाली असताना पंचायत समिती चंद्रपूर येथील सहायक गटविकास अधिकारी यांच्याकडे प्रभार दिल्या असल्याचा अफलातून प्रकार समोर आला असल्याने विविध चर्चेला पेव फुटले आहे.
गोंडपिपरी पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर सावसाकडे यांची २० जुलै, २०२३ रोजी पदोन्नती करून भद्रावती पंचायत समिती येथे सहायक गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली, तसेच आदेशही पारित झाला. सावसाकडे हे गटविकास अधिकारी हे पंचायत समिती भद्रावती येथे कार्यरत असतानाही नुकताच पंचायत समिती चंद्रपूरचे सहायक गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्याकडे देण्यात आला.
२६ मे, २०२३ च्या शासन निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र विकास सेवा गट ‘अ’ व गट ‘ब’ संवर्गातील पद रिक्त असताना पदाचा अतिरिक्त कार्यभार तेथील पंचायत समिती येथील सहायक गटविकास अधिकारी यांना देण्याचा नियम आहे. असे असतानाही चंद्रपूरचे सहायक गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांच्याकडे प्रभार दिला असल्याने विविध चर्चा सुरू आहेत.
शासननिर्णयानुसार कार्यरत एबीडीओ असतानाही तालुक्याबाहेरच्या एबीडीओकडे प्रभार देणे चुकीचे असून, शासकीय नियम वेशीवर टाकल्याचा प्रकार आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या कामामध्ये मोठी अनियमीतता दिसून येत आहे. नियमानुसार आशुतोष सपकाळ यांचा प्रभार रद्द करून, भद्रावती येथील सहायक गटविकास अधिकारी सावसाकडे यांच्याकडे देण्यात यावा.- प्रकाश खरवडे, जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना, चंद्रपूर
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असा प्रभार देण्याचा अधिकार आहे. प्रशासनाचा चांगला अभ्यास असल्याने, सपकाळ यांच्याकडे प्रभार दिला आहे.- श्याम बाखर्डे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर.