रत्नाकर चटप - नांदाफाटातालुक्यातील काही गावात आजही रस्ते पोहचले नाही. काही गावात पोहचले तेथे रस्त्याची दुरवस्था आहे. त्यामुळे ग्रामस्थ ८ ते १० किमी अंतर पायदळ चालून शहराची एस.टी. पकडत असल्याचे चित्र कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी गावात आहे.तेलंगना सीमेलगत असलेल्या थिप्पा, मांगलहिरा, कमलापूर, धनकदेवी, मरकागोंदी, उमलहिरा, शिवापूर या गावामध्ये जाण्यासाठी प्रवाशांना पायदळ पायपीट करावी लागत आहे. शहराकडे जायचे असल्यास कोरपना, पारडी येथूनच बस पकडावी लागते. काही जवळच्या गावापर्यंत खाजगी आॅटो जातात तेही दिवसातून एक-दोनवेळाच जाते. त्यामुळे नागरिक वेळ न गमावता पायदळ चालत आपला प्रवास पार करतात. काही वर्षापूर्वी गावागावांना पोचमार्गाने जोडण्यात आले. मात्र त्यानंतर रस्त्याची झालेली दैनावस्था बघता आता खाजगी वाहनही या गावांमध्ये जाताना दिसत नाही.काही गावे कोरपना तालुक्याच्या ठिकाणापासून १५ ते १८ किमी अंतरावर पहाडाजवळ आहेत. गावामध्ये रस्ते नसल्याने आणि दळणवळणाची अपुरी साधने असल्याने अनेक समस्या येथे आहेत. पुर्वी बांधलेल्या पोचमार्गाची साधी डागडुजी आणि दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे रस्ता उखडला आहे. खड्यातून प्रवाश्यांना प्रवास करावा लागत आहे. अपुऱ्या साधनामुळे गावात वैद्यकिय सुविधा नाही. मुलांच्या शिक्षणाचा अभाव असुन बोलीभाषेचा अधिक प्रभाव स्थानिकांवर आजही आहे. गावात दिर्घआजाराने पडलेल्या रुग्णांना बैलगाडीने कोरपना येथे आणावे लागते. त्यामुळे अनेकदा रुग्णांना तपासणीपुर्वीच मृत्यूला कवटाळावे लागत असल्याचे चित्र आहे.काही गावातील रस्त्यांची स्थिती बघून अधिकारी, कर्मचारी या गावांमध्ये जाणे टाळतात. काही गावात रस्त्यांच्या डागडुजीचे काम करण्यात आले. मात्र ते निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याने त्याचा काहीही उपयोग नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांच्या आहे. रस्त्यांवर खड्डे आणि धुळ असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काहींच्या आरोग्याच्या समस्याही वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांची सुविधा महत्त्वाची आहे.
आजही नागरिक करतात पायदळ वारी
By admin | Published: December 31, 2014 11:23 PM