साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : लाॅकडाऊनच्या काळामध्ये प्रत्येकाचेच हाल होत आहे. यामध्ये मोकाट प्राण्यांचे तर बेहाल सुरू असून त्यांना पोट भरणेही सद्य:स्थितीत कठीण होऊन बसले आहे. या प्राण्यांना वाचविण्यासाठी येथील प्यार फाऊंडेशनने विडा उचलला आहे. शहरातील मोकाट श्वानांना सायंकाळच्या वेळी भोजन देण्यासाठी साई अन्नपात्रम हा उपक्रम सुरू केला आहे. शहरातील ४००च्या वर श्वानांना दररोज सायंकाळच्या वेळी फाऊंडेशनचे सदस्य भोजन देतात. त्यामुळे या सदस्यांची मोकाट श्वान वाट बघत असल्याचे चित्र सध्या विविध वाॅर्डांमध्ये बघायला मिळत आहे.
चंद्रपूर शहरात मोकाट श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या श्वानांना इतरवेळी हॉटेल, रेस्टाॅरंट, बसस्टँड, रेल्वे स्टेशनमधील प्रवासी
तसेच काही सामाजिक कार्यकर्ते न चुकता सकाळ, सायंकाळ तसेच अन्य वेळीही काही ना काही खायला देतात. मात्र सद्य:स्थितीत लाॅकडाऊन असल्यामुळे सर्वच बंद आहे. हाॅटेल, रेस्टाॅरंटही बंद आहे. बसस्थानकावरही गर्दी नाही. त्यामुळे या श्वानांची उपासमार होत आहे. यामुळे त्यांना अनेक आजार जडले असून, काहींचा जीवही गेला आहे. या प्राण्यांना जगविण्यासाठी प्यार फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून, साई अन्नपात्रम हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून ते दररोज सायंकाळच्या वेळी मोकाट श्वानांना भात आणि दाळ खाण्यासाठी देत आहेत. या उपक्रमामुळे मोकाट श्वानांना आधार मिळाला असून, ते दररोज न चुकता नेहमीच्या जागेवर सायंकाळच्या वेळी येऊन फाऊंडेशनच्या सदस्यांची जणू वाटच बघत असतात.
बाॅक्स
३० सदस्यांद्वारे वितरण
चंद्रपूर शहरातील विविध वाॅर्ड्समध्ये ३० सदस्यांद्वारे मोकाट श्वानांना भोजन वितरित केले जात आहे. भोजन देण्यासाठी प्लेटचा वापर केला जात असून, श्वानांचे भोजन झाल्यानंतर त्या प्लेट उचलल्या जातात. त्यामुळे शहरात कुठेही कचरा किंवा दुर्गंधीसुद्धा होत नाही.
बाॅक्स
भात आणि दाळचे वितरण
दररोज सायंकाळी फाऊंडेशनचे सदस्य श्वानांसाठी भात आणि दाळ शिजवितात. त्यानंतर विविध वॉर्ड्समध्ये वाहनांद्वारे वितरित केले जाते. यामध्ये लालपेठ, बाबूपेठ, दुर्गापूर, तुकूम, पठाणपुरा, बालाजी वाॅर्ड, बंगाली कॅम्प आदी परिसरामध्ये विविध ठिकाणी जाऊन मोकाट श्वानांना भोजन दिले जाते. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून हा उपक्रम सुरू असल्यामुळे मोकाट श्वान सायंकाळच्या वेळी आपापल्या जागेवर येऊन गाडीची वाट बघत असल्याचेही सदस्यांनी सांगितले.
कोट
लाॅकडाऊन असल्यामुळे हाॅटेल, रेस्टाॅरंट बंद आहे. तसेच नागरिकांची ये-जा बंद आहे. इतर वेळी मोकाट श्वानांना नागरिक खायला देत. मात्र सध्याची स्थिती वाईट आहे. परिणामी श्वानांना उपाशी राहावे लागते. त्यामुळे काही श्वान कुपोषितही झाले असून, अनेकांचा जीवही गेला आहे. त्यामुळे फाऊंडेशनने मोकाट श्वानांना वाचविण्यासाठी साई अन्नपात्रम हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून दररोज ४०० च्या वर श्वानांना भोजन दिले जात आहे.
- देेवेंद्र रापेल्ली
अध्यक्ष, प्यार फाऊंडेशन