सिंदेवाही : आपल्या दारूड्या वडिलाला उभारीने मारहाण केली. त्यानंतर अपघात झाल्याची बतावणी करीत रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान एका महिन्याने वडिलाचा मृत्यू झाला. मात्र शवविच्छेदन अहवालावरून पोलिसांनी मुलाला ताब्यात घेत चौकशी केली, तेव्हा मुलाने गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना तालुक्यातील देलनवाडी येथे घडली.
याप्रकरणी मुलगा विवेक अरुण गोबाडे (२६) याला अटक केली आहे. अरुण गोपाळा गोबाडे असे मृतकाचे नाव आहे. मृतक अरुण याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो पत्नीला शिवीगाळ व मारहाण करीत होता. यामुळे त्रस्त असलेला मुलगा विवेक याने बैलगाडीला असलेली उभारी काढून वडील अरुण गोबाडे यांच्या डोक्यावर मारली. यात वडील जखमी झाले. मात्र अपघात झाल्याचे सांगून विवेकने त्यांना दवाखान्यात भरती केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा एक महिन्याने मृत्यू झाला. कोणालाही काहीही न सांगता विवेकने वडिलाचा अंत्यविधी आटोपून पुरावा नष्ट केला. परंतु शवविच्छेदन अहवालामध्ये डोक्याला जबर मार असल्याचे नमूद केल्याने पोलिसांना त्या दिशेने तपास सुरू केला. बुधवारी मुलगा विवेकला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी कलम ३०२, ३०१, १७७ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून अटक केली. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश घारे करीत आहेत.