लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : तीन दिवसांपूर्वीच वडिलांचे निधन झाले आणि बुधवारी मुलाचे. घांचाही कोरोनानेच झाला असावा, या संशयावरून त्यांच्या मृतदेहाजवळ येण्यास कोणीच तयार होईना. अशा परिस्थितीत सरपंच देवेंद्र गेडाम यांनी पुढे येत आधी वडील व नंतर मुलाचे अंत्यसंस्काराचे संपूर्ण सोपस्कार पार पाडले.वाढोणा ग्रामपंचायतअंतर्गत सोनापूर तुकूम नावाचे एक गाव आहे. या गावात राहणाऱ्या एका कुटुंबातील व्यक्तीचे (वय ७५) तीन दिवसांपूर्वीच निधन झाले. कोरोनानेच त्यांचे निधन झाले असावे, या समजुतीतून कोणीच अंत्यसंस्कारासाठी पुढे आले नाही. शेवटी सरपंच देवेंद्र गेडाम यांनी पुढाकार घेत सहकाऱ्यांच्या मदतीने अंत्यसंस्कार आटोपले व घरच्या अन्य लोकांना कोरोना तपासणीच्या सूचना दिल्या. तीन दिवसांनंतर बुधवारी मुलाची (वय ५०) प्रकृती खालावली. सरपंच गेडाम यांना गावातून कळविण्यात आले. ते लगेच सोनापूर तुकूम येथे पोहोचले व एकंदर परिस्थिती बघून गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रास ही माहिती दिली. रुग्णवाहिका गावात पोहोचली. मात्र रुग्णवाहिका दारात पोहोचत नाही, तोच मुलाचा मृत्यू झाला. अंत्यसंस्कारासाठी पुन्हा वडिलांसारखीच परिस्थिती उद्भवली. पुन्हा सरपंच देवेंद्र गेडाम यांना पुढाकार घ्यावा लागला. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पीपीई कीट मागवून ग्रामपंचायतीचे तीन कर्मचारी व एका ग्रा. पं. सदस्याच्या मदतीने मुलावरही अंत्यसंस्कार आटोपले.