फोटो : गटशिक्षणाधिकारी मडावी यांचा सत्कार करताना शिक्षक
चंद्रपूर : शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे, प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे मत प्रभारी गटशिक्षणाधिकारी बाबूराव मडावी यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर पंचायत समितीमध्ये प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून प्रभार स्वीकारल्यानिमित्त त्यांचा शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद चंद्रपूरच्या शिक्षण समितीचे निमंत्रित सदस्य तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक पती-पत्नी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जे. डी. पोटे, पती-पत्नी सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष राजू लांजेकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष कालिदास येरगुडे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, तालुका सचिव अतुल कोटजवार,पती-पत्नी सेवा संघाचे जिल्हाकार्याध्यक्ष सुनील मामीडवार, कोषाध्यक्ष देवेंद्र गिरडकर, सहसचिव विनोद बारसागडे आदींची उपस्थिती होती. पोटे तसेच लांजेकर यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन बाबूराव मडावी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जे. डी. पोटे यांनी गटशिक्षणाधिकारी मडावी यांची कार्यप्रणालीबाबत मत व्यक्त केले. चंद्रपूर पंचायत समितीला प्रामाणिक आणि कामावर प्रचंड निष्ठा असलेला अधिकारी मिळाल्याचे सांगितले, तर लांजेकर यांनी शिक्षकांच्या प्रलंबित समस्या लवकर सुटतील, अशी आशा व्यक्त केली. संचालन कालिदास येरगुडे यांनी, तर देवेंद्र गिरडकर यांनी आभार मानले.