चंद्रपूर : येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने कारगिल विजय दिवस स्थानिक धनोजे कुणबी समाज सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॅप्टन एस. एस. सोहाटा, उद्घाटक म्हणून ॲड. पुरुषोत्तम सातपुते, प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. शंकरराव अंदनकर, डाॅ. अशोक वासलवार, डाॅ. सिमला गार्जलवार, नगरसेवक पप्पू देशमुख, नगरसेवक देवानंद वाढई आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी २०१९ मध्ये भामरागड पूरग्रस्तांना विशेष योगदान देणारे माजी सैनिक सुरेश बोभाटे, दीपक मरस्कोले, परीक्षित नकले यांचा तसेच कोविड १९ मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकांचा प्रमाणपत्र, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ॲड. पुरुषोत्तम सातपुते यांनी माजी सैनिकांच्या काेर्ट केसेस विनामूल्य लढण्याचे जाहीर केले. तर नगरसेवक पप्पू देशमुख, देवानंद वाढई यांनी माजी सैनिकांना घरपट्टीत कपात करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे डाॅ. अनंदनकर माजी सैनिकांच्या सेवेसाठी २४ तास दवाखाना विनामूल्य उघडा ठेवत असल्याचा यावेळी माजी सैनिकांनी आवर्जून उल्लेख केला. याप्रसंगी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ डांगे यांनी कारगिल योद्ध्यांची शौर्यगाथा सांगितली. प्रास्ताविक संघटनेचे सचिव हरिष गाडे यांनी केले. आभार अनिल मुसळे यांनी मानले.