ब्रह्मपुरी येथे आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज फिरत्या रुग्णालयाचे (मोबाईल क्लिनिक व्हॅन) पालकमंत्र्यांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी लोकार्पण करण्यात आले होते. दुसऱ्या दिवसांपासून तीनही फिरत्या रुग्णालयाद्वारे गावागावात जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. आठवडाभरात १४ गावांमध्ये १४०३ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. यात ब्रह्मपुरी तालुक्यातील एकूण ५५२ जणांचा समावेश असून किराडी येथील १२२ नागरिकांची तपासणी, चिकटबोर्डा येथील ८८ जण, एकारा येथील १२२, सेलदा येथील २९, मुरपार येथील ७५ आणि सायगाव तुकूम येथील ११६ जणांची तपासणी करण्यात आली. सिंदेवाही तालुक्यातील पवनचक येथील ८२, पवनपार येथील १०७, गुंजेवाही येथील ९५, कोठा येथील १०१, तांबेगाढी–मेंढा येथील १०३ असे एकूण ४८८ तर सावली तालुक्यातील करोडा येथील ५०, कोंडेकल येथील ९२, पेढगाव येथील ५९, आरोली येथील ७२ आणि जाम येथील ९० असे एकूण ३६३ जणांची तपासणी करण्यात आली.
फिरत्या मोबाईल व्हॅनमध्ये एक डॉक्टर, परिचारिका व हेल्पर उपस्थित असून ताप, सर्दी, खोकला, अंग दुखणे, मधुमेह व रक्तदाब तपासणी तसेच ॲंटिजन तपासणी केली जाते.
बॉक्स
मोबाईल ट्रेकिंग सिस्टिम व ॲपची सुविधा
आयसीआयसीआय बँक फाउंडेशनच्या वतीने मेडिकेअर हेल्थ सर्व्हिसेसमार्फत या फिरत्या दवाखान्यामध्ये मोबाईल ट्रेकिंग सिस्टिम व ॲपचीही सुविधा विकसित करण्यात आली आहे. या सिस्टिममध्ये व्हॅनमधील स्वच्छतेसह दररोज होणाऱ्या तपासण्यांचा तपशील, व्हॅन किती किलोमीटर फिरते याचा तपशील आहे. डॉक्टर-पेशन्ट ॲप हेदेखील रुग्णांच्या उपयोगी पडणारे ॲप असून क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर व ॲप डाऊनलोड केल्यानंतर रुग्णांची सर्व माहिती भरल्यास सदर माहिती डॉक्टरांच्या मोबाईलवर जाते.