चंद्रपूर : प्रत्येकाला जगण्यासाठी पाण्याची गरज असते. अनेक वेळा अधिक पाणी पिण्याचा सल्ला डाॅक्टरांकडून दिला जातो; पण प्रमाणापेक्षा अधिक पाणी पिणेही शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. पाणी कमी पिल्याने जसे डिहायड्रेशनचा धोका होताे, तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले तर ओव्हर हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढेच पाणी पिणे गरजेचे आहे.
आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात ६० टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळनिर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचातील विषारी पदार्थांचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. मात्र, काही जण प्रमाणाबाहेर पाणी पितात. अनेक जण एकाच वेळी दोन ते तीन ग्लास पाणी पितात. ही बाब शरीरासाठी फायद्याची ठरण्याऐवजी नुकसानदायक ठरण्याची भीती असते.
बाॅक्स
शरीरात पाणी जास्त झाले तर
गरजेपेक्षा अधिक पाणी पिल्यास वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होतो. व्यक्तीची झोप बिघडते. त्याबरोबरच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. ज्यांना लिव्हरचा त्रास आहे, त्यांनी जास्त पाणी पिऊ नये. हृदयाचे आजार असलेल्यांनी जास्त पाणी पिऊ नये.
बाॅक़्स
शरीरात पाणी कमी पडले तर
पाणी कमी पिले तर किडनी स्टोनसारखे आजार होऊ शकतात. फुप्फुसांना धोका होऊ शकतो. डिहायड्रेशन होऊ शकते. खूप थकवा जाणवतो. थोडी मेहनत केल्यावरही लगेच थकवा जाणवतो. पाण्याच्या कमतरतेमुळे बऱ्याच वेळा शरीरास कमी रक्तदाबाची समस्या निर्माण होते.
बाॅक्स
जास्त पाणी पिणे चांगले असले तरीही त्याचे विपरीत परिणाम होतात. वारंवार लघवीला जावे लागते. यामुळे रात्रीच्या वेळी झोप योग्य होत नाही. त्यामुळे प्रमाणात आणि योग्य वेळेत पाणी पिणे गरजेचे आहे. कमी पाणी पिल्याने किडनी स्टोन, डिहायड्रेशन होऊ शकते. लिव्हर, हृदयाचा त्रास असलेल्यांनी जास्त पाणी पिऊ नये. पाणी प्रमाणात पिणे चांगले.
डाॅ. अशोक वासलवार
हृदयरोगतज्ज्ञ, चंद्रपूर