चंद्रपूर : बहुतांशवेळा तुरुंगातील कैदी किंवा सजा झालेले व्यक्ती राष्ट्रपतींकडे फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी विनंती अर्ज करतात. या अर्जानंतर अनेकवेळा त्यांची शिक्षा कमी होते किंवा स्थगितही होत असल्याचे आपण बघतो. मात्र चंद्रपुरातील एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या कारभाराला कंटाळून चक्क राष्ट्रपतींकडेच मरेपर्यंत फाशी मिळण्याबाबत अर्ज केला आहे. आश्चर्य वाटेल, मात्र हे खरे आहे.
आपल्यासोबत असलेल्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना शासनाने शासन सेवेत सामावून घेतले एवढेच नाही तर त्यांना पेन्शनही लागू केली आहे. मात्र आपल्यालाच यातून सोडून दिल्याने त्यांनी थेट राष्ट्रपतींकडे ही मागणी केली आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये सन २००० पासून चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून छगन आ. खनके हे मानधनावर कार्यरत होते. दरम्यान, २७ फेब्रुवारी २००६ रोजी शासन आदेशान्वये नियमित करण्यात आले. मात्र २००५ मध्ये शासनाने जुनी पेन्शन योजना बंद केल्याने यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनमधून वगळण्यात आले होते. कर्मचाऱ्यांनी सातत्याने लढा दिल्यानंतर शासनाने राज्यभरातील ३० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरू केली. मात्र आरोग्य विभागात कार्यरत छगन खनके यांना यातून वगळण्यात आले आहे.
आपल्यासह राज्यभरातील अन्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन तर मग आपल्याला का नाही म्हणून त्यांनी शासन, प्रशासनासोबत वारंवार पत्रव्यवहार केला. मात्र त्यांच्या मागणीची कुणीही दखल घेतली नाही. केवळ आश्वासनावरच वेळ मारून नेली जात आहे. यानंतर खनके यांचा संयम सुटला आहे. आपल्याला जुनी पेन्शन योजना सुरू करावी या मागणीला घेऊन त्यांनी जिल्हा प्रशासन ते थेट मंत्रालय, मुख्यमंत्र्यांपर्यंत वारंवार निवेदन, पत्रव्यवहार केला आहे. मात्र अजूनपर्यंत तरी काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता त्यांनी राष्ट्रपतींना एक पत्र लिहिले असून, या पत्रामध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली नसून आपल्याला न्याय मिळाला नसल्याने मरेपर्यंत फाशी द्यावी, अशी मागणी केली आहे.