मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजना : योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळगोवरी : पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक खासदाराने त्यांच्या मतदारसंघातील एका गावाची विकास कामांसाठी मॉडेल म्हणून निवड करावी व त्या गावाचा मॉडेल गाव म्हणून विकास करावा, याकरिता प्रधानमंत्री दत्तक ग्राम योजनेची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर राज्यातही मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेची घोषणा करण्यात आली होती; मात्र या योजनेत आमदारांनी गावाची निवड करताना प्रगत गावाचीच निवड केल्याने दुर्गम गावांतील नागरिकांत रोष पसरला आहे.प्रत्येक आमदाराने त्यांच्या मतदारसंघातील एका दुर्गम व अप्रगत गावाची या योजनेसाठी निवड करावी आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या गावांचा विकास करावा, अशी संकल्पना मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेमागची होती. मात्र, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अॅड. संजय धोटे यांनी या योजनेसाठी राज्य महामार्गावरील चंदनवाही या गावाची निवड केली. सदर गाव हे पूर्वीपासूनच प्रगत असून, या गावाची राष्ट्रपती पुरस्कारासाठीही निवड झाली आहे. चंदनवाही गावात विकासाच्या अनेक योजना यापूर्वीच राबविण्यात आल्या आहेत. गावातील सर्वच रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले आहे. पाण्याची अद्ययावत टाकीचेही निर्माण झाले आहे. गावात अद्यायावत स्वरूपाच्या अंगणवाड्या असून, ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. गावातील जवळपास ८० टक्के शेतजमिनीला पाण्याची सोय आहे. गाव पूर्वीपासूनच हागणदारीमुक्त आहे. सन २०१५ मध्ये सदर गावाची या योजनेसाठी निवड करण्यात आली. दोन वर्षाच्या कालावधीत दत्तक ग्रामच्या नावावर केवळ १० लाख रुपयांच्या रस्ता बांधकामासाठी स्थानिक विकास निधीतून निधीतून मंजूर करण्यात आले. गावातील कोसा निर्मिती केंद्र मागील अनेक वर्षापासून बंद असून, या केंद्राच्या पुनर्निर्माणासाठीही या दोन वर्षात कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाही. मुळात सदर योजनेसाठी अप्रगत व दुर्गम भागातील निवड अपेक्षित असताना आधीपासूनच प्रगत असलेल्या गावाची निवड का करण्यात आली, हा मोठा प्रश्न आहे.सदर गावाची या योजनेसाठी निवड झाल्यामुळे या योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यात आला आहे. सदर योजनेसाठी क्षेत्रातील एखाद्या दुर्गम व अप्रगती गावाची निवड करून विकास करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
अप्रगत गावांना वगळून प्रगत गावाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2017 12:46 AM