चंद्रपूर : महाराष्ट्रात मागील काही दिवसांत स्त्री अत्याचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. मात्र, पुरोगामी विचाराचा वारसा जपणाऱ्या या महाराष्ट्रात महिलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकताच मुंबई येथे एका ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला. वसईत एका मतिमंद मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. विदर्भातील अमरावती येथे एका अल्पवयीन मुलगी वासनेची बळी ठरली. जिल्ह्यातही अशा घटना घडत आहेत. या घटनेचा वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा व शहर चंद्रपूरच्या वतीने तीव्र निषेध करीत अत्याचारातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदन देताना वंचित महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कविता गौरकार, जिल्हा महानगर अध्यक्ष तनुजा रायपुरे, जिल्हा सल्लागार, लता साव, जिल्हा महानगर सचिव मोनाली पाटील, जिल्हा कार्यकारी सदस्य निशा ढेंगरे, इंदू डोंगरे, अश्विनी ठवसे यांच्यासह अनेकांजण उपस्थित होते.