महाविद्यालयांना भेटी : अर्चना घोडेस्वार यांच्या उपक्रमाचे कौतुक चंद्रपूर : नोकरीच्या निमित्ताने वाट्याला आलेली जबाबदारी कुरकूर न करता पार पाडणारे अधिकारी -कर्मचारी अनेक असतीलही. पण नोकरीतील चाकोरीबद्ध कामासोबतच परिघाबाहेर जावून जनजागृती करणारे अधिकारी बोटावर मोजणारेच आहेत. आपल्यावरील जबाबदारीच्या डोंगराएवढ्या कामातून वेळ काढत शाळा-महाविद्यालयात जावून विद्यार्थ्यांना वीज बचतीचे धडे देणाऱ्या एक महिला अधिकारी चंद्रपुरातही आहेत. महावितरण चंद्रपूर विभागाच्या कार्यकारी अभियंत्या अर्चना घोडेस्वार यांनी आपल्या या कामातून एक वेगळी प्रेरणावाट अन्य अधिकाऱ्यांसाठी निर्माण केली आहे.मागील वर्षभरापासून अर्चना घोडेस्वार वीज बचतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना शाळा-शाळांतून फिरत आहेत. या कामाचा कसलाही मोबदला न घेता आणि शाळांकडून कसलीही अपेक्षा न ठेवता त्या आपला आगळावेगळा उपक्रम राबवित पुढे निघाल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या युगात वीज ही चौथी प्राथमिक गरज बनली आहे. विजेशिवाय एक क्षणही कल्पवित नाही. परंतु अशी ही वीज निर्माण करण्यास वीज निर्मिती कंपनीस कोळसा व पाणी यांचे कशाप्रकारे नियोजन करावे लागते, वीज निर्मिती करताना काय काय अडचणी येतात, विजेची निर्मिती झाल्यावर वीज कशाप्रकारे वीज वाहिन्यातून ग्राहकांपर्यंत पोहोचते, विजेचा अपव्यय टाळल्यास कशी शेकडो युनिट वीज वाचू शकते, याबाबत माहिती अभियंत्या अर्चना घोडेस्वार व त्यांचे सहकारी अभियंते विद्यार्थ्यांना देत आहेत.वीज आणि पर्यावरण ऱ्हास याची सांगड घालत त्या विद्यार्थ्यांना विज बचतीचे महत्व सांगत असतात. वीज निर्मितीसाठी शेकडो टन कोळसा वापरण्यात येतो. शिवाय पाणीही अतिशय जास्त प्रमाणात वापरावे लागते. त्यामुळे विजेची बचत म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे व शेकडो टन कोळसा व पाणी वाचविणे, आपले भविष्य सुधारणे, असे साधे समीकरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना मनात बिंबवित आहेत. वीजसुरक्षा या विषयावरही या उपक्रमात त्यांचे मार्गदर्शन असते. पावसाळ्यात वीज वारंवार का जाते, तसेच उन्हाळ्यात विजेची मागणी का वाढते, वीजपुरवठा खंडीत झाल्यावर वीज कर्मचारी तो कशाप्रकारे सुरळीत करतात, त्यावेळी त्यांना काय काय अडचणींचा सामना करावा लागतो, त्यानंतर ताबडतोब वीज पुरवठा कशाप्रकारे सुरळीत होतो, या सर्व बाबी अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून दिले जात आहे.आठवी ते १२ व्या वर्गातील विद्यार्थी बऱ्यापैकी सज्ञान असल्याने त्यांनी मार्गदर्शनासाठी या वयोगटातील मुलांची निवड केली आहे. तंत्रनिकेतन महाविद्यालयात जावूनही त्या विद्यार्थ्यांना विजेचे महत्त्व समजावून देत असतात. विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, या संशोधनातून प्रदुषणविरहीत निर्मिती व्हावी, असा त्यांचा प्रत्येक शाळेत आग्रह असतो. (स्थानिक प्रतिनिधी)
कार्यकारी अभियंता देत आहेत वीज बचतीचे धडे
By admin | Published: September 24, 2015 1:08 AM