गडचांदूर : कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप नसताना वैयक्तिक द्वेषापोटी चौकशी करुन कोरपना ग्रामपंचायतीचे सचिव व सरपंच यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा खोटा अहवाल तयार करुन विस्तार अधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केला. त्यामुळे विस्तार अधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी कोरपना ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आमरण उपोषण सुरु केले आहे. तर दुसरीकडे त्याच विस्तार अधिकाऱ्याच्या विरोधात ग्रामसेवक संघटनेनेही कामबंद आंदोलन सुरू आहे. कोरपना पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (पंचायत) डी. बी. उराडे यांनी कोणतीही तक्रार नसताना कोरपना ग्रामपंचायतची चौकशी केली. गोपनीय चौकशी अहवालाद्वारे सरपंच व सचिवावर साडेचार लाखांच्या भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला. मात्र ग्रामपंचायतमध्ये कोणत्याची प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही. यासाठी संवर्ग विकास अधिकारी यांनी स्वत: चौकशी करावी व दोषी आढळल्यास आमच्यावर कारवाई करावी, अन्यथा ग्रामपंचायत व पदाधिकाऱ्यांची बदनामी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याचे निलंबन करावे, अशी मागणी कोरपनाचे उपसरपंच सुनिल बावणे यांनी केली आहे.दोन दिवसापासून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पंचायत समितीसमोर उपोषणाला बसले आहे. त्यामुळे प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याकरीता संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी तीन सदस्यीय समिती नेमली आहे. कोणतेही आरोप नसताना विस्तार अधिकारी आले आणि तुमच्या ग्रामपंचायतध्ये भ्रष्टाचार आहे, असे म्हणत चौकशी करायला लागले. अहवाल सादर केला. आम्ही दोषी आढळल्यास सरपंच, उपसरपंच व सदस्य पदाचा राजीनामा देऊ, असे सरपंचाने म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)
विस्तार अधिकाऱ्यांविरोधात कोरपना ग्रा. प. पदाधिकाऱ्यांचे उपोषण
By admin | Published: November 19, 2014 10:36 PM