लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या बफर क्षेत्रामध्ये १८ मे रोजी निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविण्यात येणार असून यासाठी वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी जुडलेल्या स्वयंसेवी संस्थांना सहभागी होता येणार आहे.सदर निसर्ग अनुभव १८ मे रोजी सायंकाळी ४ वाजता सुरु होणार असून दुसºया दिवशी म्हणजेच, रविवारी सकाळी ८ वाजता समाप्त होणार आहे. यासाठी एकूण ६ वनपरिक्षेत्रात ५० मचाण निवडण्यात येणार आहे.सहभागी होणाऱ्यांना १५ मेपर्यंत क्षेत्र संचालक कार्यालयात अर्ज सादर करावे लागणार असून अर्जाची छाननी केल्यानंतर व्यक्ती, मचाणाच्या ठिकाणांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी १८ ते ६० वयोगटातील नागरिकांना सहभाग घेता येणार आहे. निवड झालेल्या व्यक्तींना दिलेल्या गेट ला १८ मे च्या सायंकाळी ४ वाजता ओळखपत्र सोबत घेऊन यावे लागणार आहे. एका मचाणावर दोन व्यक्ती बसण्याची तरतुद राहणार असून सोबत एक गाईड राहणार आहे. अर्जदारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. सोबतच जेवण, पाणी, चटई, चादर आदी वस्तुंची व्यवस्था स्वत: करावी लागणार आहे. वैद्यकीयदृष्ट्या योग्य व्यक्तींनाच सहभाग घेता येणार आहे. विशेष म्हणजे, टॉर्च, कॅमेरा, सर्चलाईट आदी वस्तू नेता येणार नसून जेवणासाठी डब्बे आणताना प्लास्टीक, थमॉकोल, अॅल्युमिनीयम फाईलचा वापर करावा लागणार असल्याची माहिती उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांनी दिली.
१८ मे रोजी ताडोबात घेता येणार निसर्ग अनुभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 11:39 AM
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येत असलेल्या बफर क्षेत्रामध्ये १८ मे रोजी निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविण्यात येणार असून यासाठी वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी जुडलेल्या स्वयंसेवी संस्थांना सहभागी होता येणार आहे.
ठळक मुद्दे६ वनपरिक्षेत्रात राहणार ५० मचाण