चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उच्छाद मांडलेल्या वाघ आणि बिबट्यांनी हल्ला करीत दोन दिवसात तिघांचा बळी घेतल्याने मूल आणि दुर्गापूर परिसरात गावकरी आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. दुर्गापूर परिसरात पट्टेदार वाघाने एका कामगाराला ठार करण्याच्या घटनेला २४ तास उलटायचे असतानाच गुरुवारी रात्री १६ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला फरफटत झुडपात नेऊन ठार केल्याने खळबळ उडाली आहे. वाघ आणि बिबट्यांची दहशत असताना शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतीची कामे करावी लागत आहे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांना आळा घालावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
लाखोळी तोडण्यासाठी गेलेल्या महिलेला केले ठार
लाखोळी तोडण्यासाठी शेतात गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना मूल तालुक्यातील कोसंबी शेतशिवारात शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान घडली.ग्यानीबाई वासुदेव मोहुर्ले (५५) रा.कोसंबी असे मृत महिलेचे नाव आहे. दबा धरून बसलेल्या वाघाने ग्यानीबाईवर अचानक हल्ला केला. यात ती प्रतिकार करू शकली नाही. तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती काम करीत असलेल्या इतर महिलांनी गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, मूल पोलिसांना व वनविभागाला माहिती दिली. मूल पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून पंचनामा केला.
बिबट्याने उचलून नेलेल्या राजचा मृतदेह गवसला
दुर्गापूर येथील आदिवासी आश्रमशाळेला लागून असलेल्या पटांगणात शौचास गेलेल्या १६ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला फरफटत झुडपात नेऊन ठार केल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. शुक्रवारी सकाळी राजचा मृतदेह दुर्गापूर वेकोलीच्या रिजनल स्टोअर्स परिसरात चारचाकी वाहनाजवळ आढळून आला. वनविभागाने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला.
गुरुवारी रात्री दुर्गापूर वाॅर्ड नंबर १ येथे हळदीचा कार्यक्रम सुरू होता. यात नेरी (ऊर्जानगर वस्ती) येथून मित्रांसमवेत राज भडके डीजे ऑपरेट करण्याकरिता आला होता. गुरुवारी रात्री १० च्या सुमारास तो दोन मित्रांसमवेत आदिवासी आश्रमशाळेच्या लगत वेकोलीच्या खुल्या पटांगणात शौचासाठी गेला. तो मित्रांपासून थोडा दूर गेला होता. याच परिसरात एक बिबट्या शिकारीच्या शोधात दबा धरून होता. त्याने राजवर हल्ला चढविला. राजचा जोरात किंचाळण्याचा आवाज मित्रांना ऐकू आला. त्याच्या मदतीला धावून जाईस्तोवर बिबट्याने राजला ओढत झुडपात नेले होते.