चंद्रपूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता सहावी ते आठवीसाठी पदवीधर सहाय्यक शिक्षक पदाऐवजी पदवीधर विषय शिक्षकाची नव्याने पदे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांतील मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. विषय शिक्षक पदे निर्मितीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने विरोध दर्शविला आहे.प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनाने वेळोवेळी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आदींमध्ये सुधारणा केली. सध्याच्या स्थितीत इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गाला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता १२ वी आणि शिक्षक अध्यापन पदविका आहे. मात्र, उच्च प्राथमिक स्तरावर मान्य होणाऱ्या शिक्षकापैकी २५ टक्के शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पदवी आणि शिक्षणशास्त्रातील पदविका, पदवी अशी आहे.मात्र, शासनाने २३ फेब्रुवारी २०१३ च्या शासननिर्णयान्वये उच्च प्राथमिक स्तरावर २५ टक्के पदाऐवजी १०० टक्के शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता पदवी आणि शिक्षणशास्त्रातील पदवी अशी केली आहे. पूर्वीच्या पदवीधर सहाय्यक शिक्षक पदाऐवजी पदवीधर विषय शिक्षक ही पदे निर्माण केली आहेत. त्यामुळे आता भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या प्रमुख विषयांसाठी स्वतंत्र पदे निर्माण केली आहेत.बहुतांश जिल्हा परिषद शाळांत इयत्ता सहावी व सातवीच्या तुकड्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे दोन इयत्ता मिळून ७० पटसंख्येपर्यंत दोन शिक्षक व ७० च्या वर तीन शिक्षक देण्यात येणार आहेत.ग्रामीण भागातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या ७० च्या आत आहेत. त्यामुळे दोनच शिक्षक निर्धारण होणार आहेत. एक पद सामाजिकशास्त्र व दुसरे पद विज्ञान व गणित विषयासाठी, तर भाषेसाठी स्वतंत्र शिक्षक मिळणार नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे इयत्ता सहावी ते सातवीसाठी वर्ग दोन व शिक्षक दोन, अशी स्थिती बहुतांश शाळेत दिसणार आहे.जिल्ह्यात विज्ञान पदवीधर शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे विज्ञान विषयाच्या जागा मोठ्या प्रमाणात शिल्लक राहणार आहेत. विषयाची सक्ती असल्यामुळे भविष्यात सरळसेवा भरतीने विज्ञान विषयाच्या शिक्षकाची जिल्हा परिषदेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भरती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या भरती प्रक्रियेचा परिणाम कार्यरत शिक्षकांवर होऊन मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. त्यामुळे पदवीधर सहाय्यक शिक्षकाऐवजी पदवीधर विषय शिक्षक पदे निर्मितीला प्राथमिक शिक्षक परिषदेने विरोध केला आहे. (शहर प्रतिनिधी)
विषय शिक्षकांच्या निर्मितीने शिक्षक ठरणार अतिरिक्त
By admin | Published: July 19, 2014 11:51 PM