घुग्घुस : एरवी लग्न सोहळा म्हटले तर बँड, अक्षताच्या नावाखाली तांदूळ, फुले अकारण उधळली जातात. मात्र आज रविवारी येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात आयोजित विवाह सोहळयात नववधू व वराच्या परिवाराच्या संमतीने नवविवाहितांनी देहदान, नेत्रदान, अवयव दानाची घोषणा करून लग्न सोहळ्यातून समाजापुढे नवा आदर्श ठेवला. त्यांच्या या संकल्पनेचे सर्वांनी कौतुक करून स्वागत केले आहे. आज रविवारी येथील लक्ष्मण शंकर टिपले यांच्या स्मृती नामक मुलीचा विवाह बल्लारपूरच्या विद्या नगर वार्डातील दिवंगत कृष्णाजी गायकवाड यांचा मुलगा सुनील यांच्याशी येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालयात नियोजित वेळेनुसार पार पडला. यावेळी दोन्ही परिवाराच्या संमतीने नवविवाहितांनी देहदानाची संकल्पना करून घोषणा केली. इतकेच नव्हे तर देहदाना कसे श्रेष्ठ दान आहे, याचे महत्व सांगणारे एक पाम्पलेटच तयार करून त्यांनी विवाहाला उपस्थित नागरिकांना वाटले. यातून त्यांनी एक सामाजिक चळवळ उभी करून चांगला संदेश लोकांपर्यत संदेश पोहचविण्याचे काम केले. या आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडलेल्या लग्न सोहळ्याची शहरात दिवसभर चर्चा होती. महाकारूणीक पिपल्स फाऊंडेशन चंद्रपूर यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून हा संकल्प करण्यात आला. यावेळी इतरांनीही अवयव दान केले.
नवविवाहितांनी लग्न सोहळ्यातच केले नेत्र, अवयव व देहदान
By admin | Published: May 01, 2017 12:40 AM