चंद्रपूर : अवकाळी पडलेल्या पावसाने खरीप हंगामातील पीक झाडावरच काळे पडत असून कापूस, सोयाबीन मातीमोल होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून सोयाबीनच्या कापणी करून ठेवलेल्या पिकाला कोंब अंकुरण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा आसवे दाटली आहे.
पावसाळा संपायला आला आहे. परतीच्या पावसाने कपाशी, सोयाबीन पीक पूर्णतः काळे पडले आहे. पावसामुळे पूर्ण पीक उदध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे. राजुरा तालुक्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने हाती येणारे कापूस, सोयाबीनचे पीक झाडावरच काळे पडले आहे.
कापूस वेचणीला आला असताना अचानक परतीच्या पावसाने हजेरी लावली. गोवरी, सास्ती, माथरा, गोयेगाव, अंतरगाव, आर्वी,खामोणा, चंदणवाही, पोवनी, वरोडा, धिडशी, चार्ली, नीर्ली, कढोली, मानोली, बाबापूर परिसरात पावसामुळे कपाशीची बोंडे सडून गेली आहेत.
दिवाळीसारखा आनंददायी सण आपल्यालाही साजरा करता यावा, आर्थिक अडचण भागविता यावी यासाठी शेतकरी नगदी पीक म्हणून सोयाबीन पिकाची लागवड करतात; परंतु यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला. खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन पिके पूर्णतः उदध्वस्त झाली आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.