चंद्रपूर: विदर्भातील नागपूरसह वर्धा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी पावसाने दमदार हजेरी लावली. चंद्रपूरच्या दुर्गापूरमध्ये मात्र नागरिकांना पावसाचा एक वेगळाच अनुभव आलेला आहे. बरसणाऱ्या पावसाच्या पाण्यासोबत 'फेस' येत असल्याचे दिसून आले. या फेसमिश्रीत पावसामुळे अनेकांचा गोंधळ उडाला.
चंद्रपूरच्या दुर्गानगर परिसरात अनेक ठिकाणी आकाशातून पडलेल्या 'फेस'चा सडा सर्वत्र बघायला मिळाला. हा फेस नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय ठरला आहे. हा फेस का व कसा पडला याबाबत अद्याप कुठलेही कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, या फेसाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या. काही लोकांनी या फेस पडण्याचा आनंद लुटला तर कुठे अचानक कोसळलेला फेस पाहुन काही लोकांमध्ये भीति निर्माण झाली आहे.
चंद्रपुर येथील औष्णिक वीजनिर्मीती केन्द्रातून मोठ्या प्रमाणात वायु प्रदूषण होते. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वायु प्रदूषणाचाच हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. येथील संचामधून बाहेर पडणारा धूर आणि केमिकल पावसाच्या पाण्याच्या संपर्कात आल्याने ही वर्षा झाली असावी असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला. या संदर्भात पर्यावरण अभ्यासकांनी चंद्रपूरचे प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात जाऊन विचारणा केली मात्र, अद्याप मंडळाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.