लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरा, भद्रावती, राजुरा व बल्लारपूर तालुक्यातील रूग्णांना तातडीने आरोग्य सुविधा पुरविण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. शुक्रवारी या तीनही तालुक्यातील कोविड केअर सेंटरची पाहणी आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, पंचायत समिती सभापती रवींद्र धोटे, उपसभापती अनिल झोटे, नगरसेवक शेख, बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी बाळू मुंजनकर, वरोरा, भद्रावती, बल्लारपूर व राजुरा येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, आयसोलेशनमधील रूग्णांना भोजनात नॉनव्हेज, अंडे द्यावे. रोज दोन वेळचे भोजन, चहा व नाश्ता देण्यात यावे. ग्रामपंचायतींना आयसोलेशनसाठी निधी उपलब्ध दिला. त्याचा उपयोग करून तातडीने विलगीकरण कक्ष स्थापन करावे, अशा सूचनाही दिल्या. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण, लससाठा याबाबत आढावा घेतला. बल्लारपूर तालुक्यात २५० आयसोलेशन बेड्स उपलब्ध आहेत. मात्र ऑक्सिजनयुक्त बेड नाही. त्यासाठी २० जम्बो ऑक्सिजन सिलिंड उपलब्ध करून देण्याच्या सूचना पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या. खासदार बाळू धानोरकर म्हणाले, लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणी केल्याने बाहेर जिल्ह्यातील नागरिक लाभ घेत आहेत. मात्र, मोबाईल नसलेले स्थानिक नागरिक वंचित आहेत. त्यामुळे ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. आ. प्रतिभा धानोरकर यांनीही कोविड पेशंट मॅनेजमेंट पोर्टलवर गंभीर रूग्णांना प्राधान्य देण्याची सूचना केली.
राजुरात २०० बेड्स वाढविण्याचा प्रस्तावपालकमंत्र विजय वडेट्टीवार यांनी राजुरा येथील कोविड केअर सेंटरची पाहणी केली. राजुरा उपविभागीय कार्यालयात राजुरा, जिवती व कोरपणा तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. राजुरा विभागात सध्या ४० ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. २०० बेड वाढविण्याचा प्रस्तावित असून येत्या काही दिवसात कार्यान्वित होईल. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठा वाढवून देण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी केली.
वन अकादमीची पाहणीवन अकादमीमध्ये प्रस्तावित वाढीव ऑक्सिजन बेड निर्मितीची पालकमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर उपस्थित होते.